तर या द्दश्य शरीरात वसणारा जाे आत्मा आहे ताे मी आहे. हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून खरा मी हा त्या परमतत्त्वाशी जाेडलेला असल्याने त्यात आणि माझ्यात भेद नाही. द्वैत नाही. जीव आणि शिव हे अद्वैतच आहेत हे जाणणे म्हणजे शुद्ध ज्ञान हाेय. सर्व दृश्य जग नाश पावणारे आहे मात्र त्यापलीकडील तत्त्व अविनाशी आणि चिरंतर आहे. या दाेहाेंचे नित्य आणि अनित्य असे वेगळाले स्वरूप ओळखणे हे ज्ञान हाेय.दृश्य वस्तू जाणणे म्हणजे पदार्थज्ञान आहे. पण सर्वसाक्षी ईश्वरास व आपणामध्ये वसणाऱ्या त्याच्या अंशाला जाणणे हे आत्मज्ञान हाेय. जेव्हा हे ज्ञान अंगात मुरते तेव्हा प्रकृतीचा दिसणारा पसारा आणि पंचमहाभूतांचा विस्तार ओसरताे. मी काेण आहे हा प्रश्न संपून मी ताेच म्हणजे त्याच मुख्य देवाचा अद्वैत हिस्सा आहे, असे प्रत्ययास येते ते सत्य ज्ञान हाेय.
वेदांमध्ये जे महातत्त्व सांगितले आहे त्याचा नुसता जप करून काहीही साध्य हाेणार नाही तर त्याचे चिंतन आणि मनन करून आत्मबाेध करून घेतला पाहिजे असे श्री समर्थ बजावून सांगतात.अशा तऱ्हेने जेव्हा शुद्ध ज्ञान प्राप्त हाेते तेव्हा ज्ञान झाले हे जाणणारा, हाेणारे ज्ञान आणि ज्ञात हाेणारा परमात्मा या तीनही गाेष्टी वेगळेपणाने न उरता एकरूपच हाेऊन जातात. असे एकत्व जेव्हा येते तेव्हाच विमल बह्मज्ञान प्राप्त झाले असे म्हणता येईल. म्हणूनच बाह्य ज्ञानाच्या फाफटपसाऱ्यामागे न धावता या शुद्ध ज्ञानाची उपासनामार्गाने आराधना करावी व ते प्राप्त करून घेणे व परमतत्त्वाशी एकरूप हाेऊन जाणे हेच साधकाने जीवनाचे अंतिम ध्येय ठेवावे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299