गर्दी आपल्या जागी बसली आहे. तुमच्या जागेवर आणखी कुणी घुसलेलं नाहीये. लाेक आपापल्या जागेवर बसलेले आहेत.एखाद्याला वाटलं तरीही ताे तुमच्या जागेवर बसू शकणार नाही. लाेक आपापल्या जागी आहेत. त्यांचा कुणाचा हात जरी तुम्हाला लागला तरी तेवढंच, ताे स्पर्श काही आत प्रवेश करू शकणार नाही. आपण आत बिलकूल एकांतात एकटे राहू शकता.अंतरी एकच स्वर असावा. स्वत:च्या असण्याचा. अंतरी एकच स्वाद असू द्यास्वत:च्या असण्याचा, अंतरी एकच संगीत असू द्या-स्वत:च्या असण्याचं. आत दुसरं काेणीही नाही, काेणाचाही काही ठाव-ठिकाणाही नाही, शेकडाे मैलांपर्यंत, अगदी अनंतापर्यंत. आपण बिलकूल एकटे आहात, एकांतात आहात.या एकांताचा, आंतरिक एकांताचा अर्थ काही वेगळाच आहे आणि बाह्य एकटेपणाचा अर्थ फारच वेगळा आहे.
गर्दीपासून पळून जाणे हे अगदी साेपं आहे. पण स्वत:च्या आतून गर्दीला बाहेर काढून टाकणं महा कर्मकठीण आहे.गर्दीपासून दूर जाणे काय अवघड आहे? तुमच्याजवळ दाेन पाय आहेत. जा पळून.गर्दीतून बाहेर पडायला दाेन पाय पुरेसे आहेत.त्यात काय अवघड आहे? दाेन पाय आहेत. जा पळून. गर्दी संपेपर्यंत थांबू नका. पाेहाेचाल का एकांतात असे? एकटेपणाच्या एकांतात पाेहाेचाल फार तर. पण गर्दीला आतून बाहेर फेकून देणे, ही गाेष्टच फार अवघड आहे, पाय साथ देणार नाहीत. या गर्दीपासून दूर जायला कितीही पळा, जाेरानं पळा, आतली गर्दी आपली आपल्या ठिकाणी तशीच हजर राहील.