ओशाे - गीता-दर्शन

    15-Mar-2023
Total Views |
 
 
 

Osho 
दुसऱ्या काेणाच्या उपस्थितीची आवश्यकता नसणं असा एकांताचा अर्थ आहे. हा फरक नीट समजावून घेतला पाहिजे.आपण जंगलात बसला आहात. बिलकूल एकांतात, शेकडाे मैलांपर्यंत दुसरं काेणीही हजर नाही. तरी पण आपण एकांतात असू शकाल असं मला वाटत नाही. आपल्या असण्याची सारी शैलीच गर्दीत असण्याची शैली आहे. आपण एकटे असाल पण एकांतात असू शकणार नाही.तसे वरकरणी एकटे आहात खरे. एकटेच बसला आहात, आसपास तर काेणीही दिसत नाही, पण एवढ्यानं एकांत नाही हाेत. जरा आत डाेकावून पहा बरं. तर मग आपण त्यांना गावात, घरात, साेडून आलात ती सगळीजण आपल्या अंतरात घर करून बसलेली आपणाला आढळतील.तिथं मित्र तर भेटतीलच; पण शत्रूही असतीलच.
 
प्रियजन, कुटुंबीय, दुकान, बाजार, काम, धंदा सगळं सगळं तिथं असेल. आत सगळे हजर असतील. सर्व गर्दी तिथं उपस्थित असेल. मग फारतर आपण एकटे आहात असे म्हणता येईल, पण एकांतात नाही.एकांताचा अर्थ आहे-आत एकच स्वर वाजत असेल, आत दुसऱ्या कुणाचीही उपस्थिती नसेल, तर मग याच्या उलटसुद्धा हाेऊ शकतं.ज्या माणसाला एकांताचं रहस्य समजलं ताे गर्दीत असला तरी एकांतातच असेल. त्याच्याबाबत गर्दी कधीच अडचण करीत नसते, ती तर सदा बाहेर असते. आपल्या आत काेणी प्रवेश करू शकतं काय? आपण इथं बसला आहात, गर्दीत अगदी दाटीवाटीने, बसला आहात तरी आपण एकटे हाेऊ शकता.