भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने चकित झाला आहे.किंवा ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे येथे शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणचार घेण्यासाठी आला आहे. भगवंतांची हजाराे मुखे व त्यांची विक्राळ रूपे पाहून अर्जुन भीतिग्रस्त झाला आहे. याच मन:स्थितीत ताे भगवंतांना म्हणाला, देवा, हे सर्व जग तुमच्या मुखातून निघालेल्या ज्वालात अडकलेले आहे. त्याला तारणारा देव आहे की नाही? या सर्व जलचरांना काळरूपाच्या जाळ्यात तू अडकविले आहेस. तुमचे विश्वरूपदर्शन हेच हे जाळे आहे.पेटलेली लाखेची घरेच जळायला मिळालेली आहेत. अग्नी कसा पाेळताे हे त्याला ध्यानात नसते तरी जे पाेळले जाते त्याचे प्राण कासावीस हाेतात. आपण किती प्राणघातक आहाेत हे शस्त्र कधी जाणते का?
त्याप्रमाणे देवा, तुमच्या उग्रतपाची तुम्हांस जाणीव नाही. देवा, तू म्हणताेस त्याप्रमाणे सर्व प्राण्यांत एकच आत्मा आहे. तर मग हे जीवघेणे संकट का प्राप्त झाले आहे? मी तर आता जगण्याची आशाच साेडली आहे आणि देवा, तूही संकाेच न करता जे करायचे असेल ते कर. या उग्ररूपाला तू किती वाढवीत आहेस? देवा, तू स्वत:चे भगवंतपण थाेडे आठव ना.माझ्यावर थाेडी कृपा कर ना. कृष्णा, एक वेळ माझी विनंती ऐक. असे म्हणून अर्जुनाने भगवंतांच्या चरणांना वंदन केले आणि ताे म्हणाला, मी विश्वरूप दाखव असे म्हटले हे खरे, पण तू विश्वाचा संहार करायला निघालास.तेव्हा तू आहेस तरी काेण? ही भयानक ताेंडे कशासाठी? सर्व हातांत शस्त्रे कशासाठी धारण केली आहेस?