पृथकाकारे स्वतंत्र। जितुके देव तितुके मंत्र ।।2।।

    13-Mar-2023
Total Views |
 
 

saint 
 
गुरू असे मंत्र शिष्याच्या कानांत गुह्य म्हणून सांगताे, शिवाय त्याला संबंधित जप, ध्यान, पूजा आणि काहीवेळा यंत्रे यांचीही माहिती देताे.एखादा गुरू शिव शिव असा शंकराचा, तर एखादा गुरू हरी हरी असा विष्णुनामाचा उपदेश करताे. काेणी विठ्ठलनाम सांगताे तर काेणी श्रीराम नामाचा जप करण्यास सांगताे. काही गुरू ओंकाराची साधना सांगतात, तर काही कृष्णनाम, अच्युतनाम आणि अनंतनामाचा गुरुमंत्र देतात. प्रत्येक गुरूला त्याच्या अथक साधनेतून गुणप्राप्ती झालेली असते. या मार्गामध्ये त्याला अनेक एेंद्रिय व अतींद्रियही अनुभव आलेले असतात, शिवाय क्वचित काही सिद्धीही प्राप्त झालेल्या असतात. तेव्हा या स्वानुभवाच्या आधारेच ताे आपल्या शिष्याला तसाच उपदेश करीत असताे. त्यामुळे श्रीसमर्थ म्हणतात की, असे किती म्हणून विविध प्रकार सांगावेत? पुरुष आणि प्रकृती म्हणजेच शिव आणि शक्ती यांची असंख्य आणि अनंत नावे आहेत.
 
ज्याला ज्या नामात अनुभव आला त्याच नामावर त्याची श्रद्धा असते आणि तेच त्याला मनापासून आवडते. त्यामुळे ताे गुरू तेच नाम व ताेच मंत्र आपल्या शिष्याला उपदेश म्हणून देत असताे. एखाद्या पर्वतशिखरावर जायचे असेल तर अनेक वेगवेगळे रस्ते असू शकतात, तसे आत्मज्ञान प्राप्त करण्याचे असे वेगवेगळे उपासनामार्ग असतात. मात्र रस्ता काेणताही घेतला तरी शिखर सर करणे हेच ध्येय असावे लागते, तसे काेणताही उपासनामार्ग गुरूने सांगितला तर त्यामागे गुरूचे आत्मज्ञान आणि ताे मार्ग अनुसरण्यास शिष्याची ज्ञानप्राप्तीची तळमळ असेल, तरच ताे शिष्य साधनेत सफल हाेऊ शकताे; म्हणून मार्गापेक्षा आत्मज्ञानालाच खरे महत्त्व आहे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299