यातून खऱ्या सुखाचा शाेध घ्यावयाचा असेल तर प्रपंच कर्तव्याचा मानून ताे नेमस्तपणे जरूर करावा; पण केवळ प्रपंचच सर्वस्व न मानता, त्याचे नाशिवंतपण लक्षात घेऊन थाेडी तरी परमार्थमार्गाची कास धरावी.त्यायाेगे तुम्हाला आत्माेद्धाराची याेग्य दिशा सापडू शकेल. परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:चे कायमचे अपरिमित नुकसान करून घेणे आहे आणि म्हणून डाेळसपणे परमार्थाचा विचार केलाच पाहिजे, असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे. असा विचार करून आणि पूर्वी सांगितलेले कुशिष्यांचे अवगुण टाळून जे सच्छिष्य हाेऊन परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूला शरण जातात त्यांना मात्र अलाैकिक सुख मिळू शकते. अशांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली असते.
त्यांची गुरूवर श्रद्धापूर्वक निष्ठा असते. त्यांची आत्मज्ञान मिळविण्याची इच्छा तीव्र असते आणि परमेश्वरासंबंधी त्यांचा भाव दृढ झालेला असताे. त्यांची उपासना व साधना प्रगत झाल्यावर त्यांना सद्गुरू कृपेने आत्मज्ञान निश्चितपणे हाेते, त्या स्वानंदात ते सदैवचे सुखी हाेऊन राहतात आणि ऐहिक सुखापेक्षा अलाैकिक अशा आत्मिक सुखाच्या साेहळ्यात चिरंतनपणे रंगून जातात.अर्थात या सिद्धीमागे परमेश्वरी कृपा, सद्गुरूकृपा यांच्याबराेबरच त्यांच्या अंगच्या सच्छिष्यत्वाचाही माेठा वाटा असताे, असे सांगून साधकांनी सच्छिष्य व्हावे असे श्रीसमर्थ पुन्हा बजावतात! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299