मागील समासात सद्गुरूची लक्षणे विशद केल्यानंतर आता शिष्यलक्षण या तिसऱ्या समासात श्रीसमर्थ सच्छिष्याची लक्षणे सांगत आहेत. ब्रह्मपदी पाेचून स्थिर झालेला सद्गुरू असला तरी त्याच्याकडून परमार्थ मार्ग साधण्यासाठी येणारा शिष्यही गुणवान असावाच लागताे.मुंडक उपनिषदामध्ये आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय असले पाहिजे, हे सांगताना ते ज्ञान केवळ कुशाग्र बुद्धी किंवा श्रवणाने प्राप्त हाेत नाही, तर त्यासाठी साधनाची चिकाटी, दृढनिश्चय, सदाचरण, तपाेसाधना आणि सातत्याची उपासना या गाेष्टी आवश्यक असतात असे स्पष्ट केले आहे. ज्ञान देणारा आणि मार्ग दाखविणारा सद्गुरू असला तरी ते घेण्याची पात्रता शिष्याजवळ असेल, तरच त्याला लाभ हाेईल.
शिष्यच जर अपात्र असेल तर कितीही श्रेष्ठ सद्गुरूच्या चरणापाशीही त्याला काहीच लाभ हाेणार नाही. श्रीसमथम्हणतात की, सद्गुरूशिवाय शिष्य वाया जाईलच; पण जर सद्गुरूला सच्छिष्य मिळालाच नाही, तर त्या गुरूचेही सर्व श्रम ुकट जातील आणि शिष्य आहे तसाच राहील.यासाठी श्रीसमर्थ शेतीचे उदाहरण देतात. ते म्हणतात, सद्गुरूकडून मि ळणारे ज्ञान उत्तम बीजाप्रमाणे आहे; पण त्यापासून उत्तम पीक येण्यासाठी जशी जमीनही सुपीक हवी, तसेच आत्मज्ञानी हाेण्यासाठी ताे सच्छिष्य असलाच पाहिजे.
जर उत्तम बी खडकाळ भूमीत पेरले तर पीक येत नाही आणि सुपीक जमीन असली; पण किडके बी असले तरीही पीक येत नाही. त्याचप्रमाणे शिष्याचे आत्मज्ञानाचे पीक उत्तम येण्यासाठी सद्गुरूही अधिकारी हवा आणि शिष्यही सर्वाेत्तम लक्षणयुक्त, जिज्ञासू व चिकाटीचा हवा.