आत्मनिवेदनाचे लक्षण । देवासि वाहावे आपण । तत्त्वविवरण जाण ।।2।।

    09-Feb-2023
Total Views |
 
 

saint 
तेव्हा हा भेद जाणणे म्हणजेच सत्य वस्तू जाणणे हाेय. आपल्या साधनामध्ये आपण स्वत:ला भक्त म्हणवताे म्हणजे भगवंतापासून विभक्त नाही असे म्हणताे आणि भक्ती मात्र विभक्तपणे करताे हा माेठाच विराेधाभास आहे, असे सांगून श्रीसमर्थ याच तऱ्हेच्या ज्ञान आणि अज्ञान, लक्षण आणि विलक्षण म्हणजेच लक्षणरहित अशी विराेधाभासांची उदाहरणे देऊन सांगतात की, आपण सूक्ष्म विचार करून आपल्या अंतर्मनाचा वेध घ्यावा व खरा देव ओळखावा. त्यायाेगे तत्त्वचिंतनाने खरे ज्ञान प्राप्त झाले की आपला सर्व ‘मी’पणा संपून खरा देव प्रत्ययास येईल.एक मुख्य परमेश्वर आणि सर्व दिसणारे विश्व हा त्याचाच लीलास्वरूपी प्रकृती विस्तार आहे. अशा वेळी हा ‘मी’ चाेरासारखा कसा मध्येच उपटताे याचा विचारवेध घेतला पाहिजे; त्यायाेगे केवळ देहाचे प्रेम व अभिमान यामुळे हा ‘मी’पणा आला आहे हे माहीत हाेईल. हे सकल विश्व त्या परमेश्वराचाच विस्तार आहे.
 
आपणही त्याचाच अंश आहाेत. मी काेण आहे याचे उत्तर मी ताेच आहे म्हणजेच आत्मा आहे, म्हणजेच त्या एका परमेश्वराचा अंश आहे हे ज्ञान हाेणे म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्ती हाेय.असा हा आत्मा निर्गुण, निराकार आणि अविनाशी आहे. त्याच्याशी आपण एकरूप झालाे की आपण वेगळेपणाने उरतच नाही. असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, आत्मा म्हणजे जर अद्वैत आहे तर तेथे द्वैताद्वैत म्हणजे ताे व आपण यांचे वेगळेपण काेठून असणार? याचाच मतितार्थ असा की, आपण म्हणजे देह आहाेत हा अभिमान चुकीचा आणि असत्य आहे. देहामध्ये असणारा आत्मा हे आपले खरे स्वरूप आहे हे जाणणे आणि त्याची जगदात्मा जाे परमेश्वर त्याच्याशी असणारी एकरूपता जाणणे हेच भक्तीचे खरे साधन व साध्यही आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299