आपण राेजच्या व्यवहारात असे अनेक भक्त पाहताे की, जे एखादा हेतू मनात धरूनच भक्ती करीत असतात. मुलीचे लग्न जमावे म्हणून मारुतीला जाणारे, परीक्षेत यश मिळावे म्हणून संकष्टी चतुर्थी करणारे हे खरे भक्त नव्हेतच.त्यांची भक्ती मनात वासना धरून केलेली असते, तेव्हा ती त्या वासनेची भक्ती हाेते; देवाची नव्हे! अशी माणसे मग इच्छित आशा पूर्ण झाली नाही की देवालाच नावे ठेवतात. अशांनी भगवंताची भक्ती भगवंतप्राप्तीसाठीच करावी अन्य इच्छापूर्तीसाठी नव्हे, असा इशारा देऊन श्रीसमर्थ म्हणतात की, आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ असते पण भगवंताची कृपा त्याहूनही श्रेष्ठ आहे. कारण जीवावर बेतले तर मातेने पुत्राचा वध केल्याची उदाहरणे आहेत; पण भगवंताने भक्ताचा वध कधीही केलेला नाही. उलट कल्याणच केले आहे.
आपणा सर्वांना बिरबलाची आणि माकडीणीची गाेष्ट माहीतच आहे. पाणी नाकाताेंडातून जाऊ लागल्यावर त्या माकडीणीने स्वत:चे पिलूही पायाखाली घेतले हाेते. म्हणून देवप्रीती ही सर्वश्रेष्ठ असून देव अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कारुण्यसिंधू आणिकृपासागर आहे. ताे आपल्या भक्तांना कधीही दूर लाेटत नाही. ताे त्यांच्या संकटकाळात त्यांच्या रक्षणासाठी धाव घेताे आणि अगदी मृत्युपाशात सापडलेल्या भक्तालाही प्रसंगी वज्रस्वरूप हाेऊन साेडविताे.आपल्याला आपल्या नातेवाइकांचे, जिवलग मित्रांचे प्रेम असते. आपल्या अडचणीच्या वेळी ते सर्वजण धावून येतील आणि मदतकरतील अशी आपली खात्री असते; पण जगात प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर ताे विपरीत दिसताे.