परमात्म्याचे सुख प्राप्त करून घेऊन जे आनंदित हाेतात, त्यांना रात्र व दिवस यांचे भान कसे राहत नाही, याचे भगवंत येथे वर्णन करीत आहेत. अंत:करणाने ते माझेच रूप बनतात. माझ्यामुळे ते तृप्त झालेले असतात.माझ्या बाेधाच्या गुंगीमुळे ते जन्ममरणाला विसरतात. या आत्मज्ञानाच्या मदामुळे ते आनंदाने व प्रेमाने नाचतात. ते एकमेकांस ज्ञानच देतात व ज्ञानच घेतात. ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी एक सुंदर व समर्पक दृष्टांत दिला आहे. जवळ असणारी दाेन तळी उचंबळून आली असताना त्यांचे पाणी एकमेकांत मिसळते.लाटा एकरूप हाेतात. त्याप्रमाणे माझी व भक्तांची स्थिती असते. भक्तांना भक्त मिळाले की, आनंदाच्या लाटांची वेणी गुफंली जाते आणि बाेधच बाेधाचा अलंकार हाेताे.
सूर्याने सूर्याला ओवाळावे अथवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, दाेन प्रवाह एकमेकांत मिसळावेत, गंगा व यमुना यांचा संगम व्हावा, त्याचप्रमाणे भक्त व मी यांच्या ऐक्यरसाचा संगम हाेताे. अशी माझी प्राप्ती झाली की, ज्ञानी भक्त तृप्त हाेतात. गुरू व शिष्यएकांतस्थळी जाऊन ज्याप्रमाणे गुरू शिष्याला ॐकाराचा उपदेश देतात.त्याचप्रमाणे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे हे भक्त वावरत असतात. पूर्ण उमललेली ुलाची कळी आपला सुवास दडवू शकत नाही.राजास व रंकास एकच सुवास ती देत असते.त्याप्रमाणे भक्त सर्व जगात माझेच वर्णन करतात. या आनंदात कधी ते वर्णन करण्याचेही विसरतात. या विस्मरणातही अंगाने व जीवाने ते माझ्यातच विरून राहिलेले असतात.