कामवासना आणि पैसा ही दाेन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर काेणी विचारले की, ‘त्यातल्या त्यात जास्त घातक काेणते ते सांगा,’ तर मी सांगेन की, ‘पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे.’ भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, ताे आपण सत्पात्र आहाेत म्हणून दिला आहे का? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी हाेय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल, पण ‘स्व’ देणार नाही. ‘स्व’ देऊन मग ‘सर्व’ ठेवले तरी चालेल, पण ‘सर्व’ देऊन ‘स्व’ ठेवला, तर मात्र ते चालणार नाही; म्हणजेच, ‘मी देताे’ ही भावना राहिली, तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते.
देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलाे, तर इमारत पक्की कशी हाेणार? मी ‘माझा’ देह म्हणताे, पण ताप येणे न येणे, इजा हाेणे न हाेणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणताे, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लाेकांना मला घरी न्यावे लागते; म्हणजे किती परस्वाधीन जीवित आहेत! देहाने कितीही कार्य केले, तरी ते कळसाला नाही पाेचणार. अभिम ानाने केलेले कार्य कसे कळसाला पाेचणार? एक भगवत् इच्छेने कार्य केले, तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून, रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले; म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले; आणि जाे भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले, आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. मी खरे सांगताे, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा साेपा उपाय म्हणजे संतसमागम हाच हाेय.
आज खरे संतच कुठे आहेत? असे आपण म्हणताे, पण आम्हाला संत भेटावा, ही तळमळच खरी लागलेली नसते.संतात संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जाे राम हाेता ताेच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे! संतांना आपण खाेटेपणा देताे, पण माझा भाव शुद्ध नाही, हे नाही जाणत.विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संताकडे जाताे, पण संताला अर्पण करून घेण्याकरिता कितीजण संताकडे जातात? देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील? आपल्याला भगवंताचा ध्यास लागला पाहिजे.प्रत्यक्ष हातून न झाले तरी ध्यास लागला पाहिजे, त्याचे व्यसन लागले पाहिजे. त्याला आवड पाहिजे, आणि आवड उत्पन्न हाेण्याकरिता सहवास पाहिजे. त्याकरिता नाम घ्यावे.