ऐसा कृतकृत्य केला स्वामी। बहुवे लळा पाळिला तुम्हीं। दाविलें जें हरब्रह्मीं। नायकिजे कानीं।। 11.583

    25-Feb-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
आपल्या आग्रहासाठी भगवंतांनी विश्वरूप दाखविले हे पाहून अर्जुन चकित झालाच, पण त्याचे मन संकाेचाने अधिक भरून आले. देव किती माेठा, आपण किती लहान, आपण त्याच्याशी सलगी किती केली हे सर्व अर्जुनाने देवाला बाेलून दाखविले. या वेळी त्याच्या अंगावर अष्टसात्त्विकभाव प्रकट झाले हाेते. ताे सद्गदित हाेऊन देवाला म्हणाला, देवा, प्रसन्न व्हावे. मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ.तू सर्व जगाचा मित्र आहेस. तू आमचा आप्त आहेस, असे समजून आम्ही कधी तुला मान दिला नाही. सर्व देवांचा देव तू असून मी मात्र तुला सारथी करून तुझ्यावरच प्रभुत्व गाजविले. पण देवा, तुझे माझ्यावर प्रेम असल्यामुळे तू माझेच वर्णन करीत हाेतास. देवा, मी गर्वाने अधिक बडबड करीत हाेताे. माझ्या हातून झालेल्या अपराधांना मर्यादा नाही.
 
माझ्या चुकांबद्दल तू क्षमा करावीस. देवा, ही विनंती तरी करण्याची याेग्यता माझ्याअंगी आहे काय? येथे ज्ञानेश्वर नेहमीप्रमाणे त्यांचा आवडता दृष्टांत देऊन म्हणतात की, लहान मूल ज्याप्रमाणे बापाशी सलगी करते, त्याप्रमाणे देवा, माझ्या अपराधाची क्षमा कर. आपण आमच्या घरी उष्टी काढलीत याची क्षमा असावी.देवा, तुमच्याशी मी कसा वागलाे तर एखादी पतिव्रता ज्याप्रमाणे काेणतीही गाेष्ट पतीपासून लपवून ठेवत नाही.त्याप्रमाणे मी तुम्हांस विनासंकाेच सांगितले, विश्वरूपाचा हट्ट धरला आणि ताे तुम्ही पुरविला. तुम्ही कल्पवृक्षाची झाडे अंगणात लावली. कामधेनूचे वासरू खेळावयास दिले.अमृताचा पाऊस पाडलात. चिंतामणी रत्ने पेरलीत. महाराज, त्याप्रमाणे तुम्ही मला कृतकृत्य केले आहे. शंकर व ब्रह्मदेव यांना जे दाखविले नाही ते दाखवून माझे लाड पूर्ण केलेत.