जय जय जी सद्गुरू पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा ।।

    20-Feb-2023
Total Views |
 
 
 
saint
श्रीसमर्थांच्या काळी लाेकमानसामध्ये धर्मकृत्यांचा माेठा पगडा हाेता. देवाची भक्ती करावयाची म्हणजे ही कर्मे करावयाची असेच समजले जाई व ती केल्यामुळे देव प्रसन्न हाेऊन माणूस माेक्षपदाला जाईल, असा विश्वास बाळगला जात असे. अशा धर्मकर्मांचे स्वरूप वर्णन करायचे, तर व्रते, उद्यापने, दानधर्म, तीर्थयात्रा, टिळामाळा, स्नानसंध्या, पूजापाठ, स्तुतीपर स्ताेत्रपठण, उपासतापास, यज्ञयाग असे करता येईल.खरं पाहिलं तर या सगळ्या गाेष्टी करताना मनामध्ये काही ऐहिक इच्छा धरून केल्या जात असत आणि नाव मात्र देवाचे असे.धनप्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी, लढाईत जय मिळावा, अशा अनेक सुप्त इच्छा धरून ही कर्मे करणे म्हणजे तर ऐहिकाचा लाेभ कमी करण्याऐवजी वाढवणेच हाेय आणि त्यामुळे आत्मज्ञान हाेण्याऐवजी साधनामध्ये झालेली प्रगती,जसे एखाद्या गळक्या भांड्यातून पाणी झिरपून जावे, तशी नाहीशी हाेण्याचीच शक्यता आहे.
 
म्हणून खऱ्या ज्ञानाशिवाय इतर ज्या ज्या गाेष्टी केल्या जातात, त्या जन्ममृत्यूतून मुक्त हाेण्याऐवजी पुढील जन्माची तयारी करणाऱ्याच ठरतात. हे ज्ञान प्राप्त हाेण्यासाठी सद्गुरू केल्यावाचून गत्यंतर नाही.सद्गुरूकृपेचा प्रकाश नसेल, तर तसा एखादा डाेळस माणूसही अंधारात ठेचकाळून पडताे तशीच साधकाची अवस्था हाेईल. ‘‘तुझे आहे तुझपाशी । परि तूं जागा चुकलासी’’ अशी आपली स्थिती असते. तेव्हा तुझे तुझ्याजवळच आहे व ते शाेधण्यासाठी बाहेर न बघता तू स्वत:च्या अंतर्मनातच त्या परमात्म्याचा शाेध घे, हे सांगण्यासाठी जाणता आणि समर्थ सद्गुरू लागताे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299