अर्जुन भीतीने ग्रस्त झाला आहे हे पाहून श्रीकृष्ण त्याला म्हणाले, अर्जुना, मी काळ आहे हे पक्के समज. जगाचा नाश करण्यासाठीच मी प्रकट झालाे आहे. चाेहाेंकडे माझीच ताेंडे पसरलेली आहेत. हे ऐकून अर्जुन मनात म्हणाला की, हा रे! मी एका संकटाने ग्रासलाे हाेताे.भगवंतांना दया करा म्हणून विनंती केली पण ते ‘मी काळ आहे’ असे म्हणून मलाच दटावीत आहेत. आपल्या बाेलण्याने अर्जुन कष्टी हाेईल हे जाणून भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, आणखीन एक गाेष्ट ध्यानात ठेव. या संकटरूपी वणव्यात तुम्ही पांडव सापडणार नाहीत. हे वचन ऐकताच अर्जुनाने जाऊ पहाणारे प्राण त्याने आवरून धरले.ताे श्रीकृष्णांच्या बाेलण्याकडे लक्ष देऊ लागला. श्रीकृष्ण म्हणत हाेते, अर्जुना, तुम्ही पांडव माझे सखे आहात.
तुमच्याशिवाय सगळ्या जगाचा ग्रास करायला मी निघालाे आहे. देव असे म्हणत हाेते तरी अग्नीत ज्याप्रमाणे लाेण्याचा गाेळा टाकावा त्याप्रमाणे सर्व जग भगवंतांच्या मुखात जात हाेते. ते म्हणत हाेते; तुझे हे शत्रू व्यर्थ वल्गना करीत आहेत.शाैर्यामुळे गुरगुरत आहेत. हत्ती, शस्त्रे यमाच्या वरचढ आहेत असे त्यांना वाटते. आम्ही मृत्यूला मारू असे ते वल्गना करतात. पराक्रमाच्या मदावर हे सैनिक स्वार झाले असून संपत्तीच्या सहाय्याने माझ्याशी बराेबरी करू पाहातात. त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण व अग्नीपेक्षा दाहक आहेत. त्यांची विषाशी तुलना केली तर कालकूट विष मधुर आहे असे म्हणावे लागेल. पण अर्जुना, हे पाेकळ ढग आहेत. भिंतीवर रंगवलेली फसवी चित्रे आहेत. हे सैन्य म्हणजे मृगजळाचा पूर आहे किंवा कापडाचा सर्प आहे.