कल्पांत हाेऊन जेव्हा सर्व विश्वच नाश पावते तेव्हा पहिल्या तिन्ही मुक्तीही विरून जातात; पण सायाेज्यमुक्ती मात्र अविचल, अखंडित आणि चिरस्थायी राहते.परमात्मा निर्गुण आहे तशी सायाेज्यमुक्ती हीही निर्गुण निराकार परमात्म्यात विलीन हाेणे आहे आणि म्हणून या मुक्तीमार्गाचे अंतिम साध्य भगवंताच्या स्वरूपाशी अनन्य हाेणे असल्याने ती निर्गुण भक्तीनेच मिळू शकेल. सगुण भक्ती ही पहिली पायरी, ती चढून गेल्यावर निर्गुण भक्ती ही दुसरी पायरी आणि ती पूर्णत्वाला गेल्यावर निर्गुण निराकार परम ात्म्यात विलीन हाेऊन सायाेज्यमुक्ती प्राप्त करणे हे अंतिम साध्य हाेय.
सगुण भक्ती ही भाव कमी पडला की, डगमगू लागते; पण ती पायरी पार करून निर्गुण भक्तीला लागलेला साधक निश्चल राहताे.
अर्थात हे सर्व आकलन हाेऊन साध्य हाेण्यासाठी आपला अहंकार पूर्णपणे गेला पाहिजे. षड्रिपूंवर विजय मिळवून त्यांची जागा विवेक आणि वैराग्याने घेतली पाहिजे आणि हे कसे करावे याचा मार्ग सद्गुरुच दाखवू शकताे, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, त्याच्या मार्गदर्शनाने आणि कृपेनेच सायाेज्यमुक्ती मिळत असल्याने साधकांनी गुरुचरणी विश्वास धरून त्याला शरण जावे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299