आपण या सर्व सृष्टीत भरून कसे आहाेत, हे सांगताना श्रीकृष्णांनी आणि ज्ञानेश्वरांनी नेहमी - प्रमाणे दृष्टांत दिलेले आहेत. ज्याप्रमाणे वस्त्रांमध्ये आडवे व उभे म्हणजे ओतप्राेत एक सूत्रच भरलेले असते. त्याप्रमाणे सर्व जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी परमात्माच भरलेला आहे.हे तत्त्व स्पष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या विभूती विस्ताराने सांगत आहेत. अर्जुना, अत्यंत वेगवान असा वारा मीच आहे. शस्त्रधारण करणाऱ्यांतील रामचंद्रांनी धर्मांचा उद्धार केला. या अशा विभूतींबराेबर आणखीही इतर विभूतींचा निर्देश येथे करण्यात आलेला आहे, पण परमात्म्याचे व्यापकत्व एकदा समजले की, अनेक विभूती सांगून काय उपयाेग? तरी अर्जुना, तू विभूती विस्ताराने विचारल्यास म्हणून मी सांगितल्या.आणखीही थाेड्या ऐक.सर्व विद्यांमधील अध्यात्मविद्या ही माझी विभूती आहे.
विद्वान वक्त्यांतील वादविवाद मीच आहे. या वादांतील तर्क व त्याचे प्रतिपादन ही माझीच विभूती आहे. सर्व अक्षरांतील अ हे अक्षर माझी विभूती आहे. सर्व समासांतील द्वंद्व समास हा मी आहे. सर्वांचा ग्रास करणारा काळ मी आहे. सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेवही मीच आहे.सर्वांचा नाश करणारा मृत्यू मीच आहे. यानंतर भगवंतानी स्त्रीवर्गातील सात विभूती सांगितल्या आहेत. कीर्ती, संपत्ती, वाचा, स्मृती, बुद्धी, क्षमा इत्यादी सर्व विभूती माझ्याच आहेत. वेदांतील, सामांतील बृहत्साम मी आहे. सर्व छंदात गायत्री मी आहे. सर्व मासांत मार्गशीर्ष मी आहे. सर्व सहा ॠतूंत वसंतॠतू मी आहे. कारस्थानांत जुगार मी आहे.अर्जुना, सर्व तेजस्वी पदार्थांत मी आहे.