ओशाे - गीता-दर्शन

    11-Feb-2023
Total Views |
 
 

Osho 
कारण ताे म्हणताे की सगळं विचारणं हे लहान मुलांच्या विचारण्यासारखंच आहे. आणि सगळी उत्तरं जरा जास्त वयाच्या मुलांनी दिलेलीच उत्तरं आहेत बस्स्.बाकी काही एक फरक नाहीये. थाेडी छाेटी मुलं प्रश्न विचारीत असतात.त्यांची उत्तरे थाेडी माेठी मुलं देत असतात.तुम्ही कधी घरात काय चालतं त्याचा विचार केला आहे की नाही ! समजा तुमच्या घरात दाेन मुलं आहेत, एक छाेटा अन् एक माेठा. ती तुम्हाला प्रश्न विचारतात, आणि तुम्ही उत्तरे देता. पण जेव्हा तुम्ही घरात नसता, तेव्हा छाेटा माेठ्याला विचारू लागताे आणि माेठा उत्तरं देऊ लागताे. जे काम तुम्ही करीत हाेतात तेच ताे करू लागताे. ही सर्व प्रश्नाेत्तरे म्हणजे मुलांमध्ये झालेल्या चर्चा आहेत.जेव्हा कुठला प्रश्न नसताे. अन् कुठलं उत्तरही नसतं तेव्हा प्राैढत्व घडते. जिथे इतके परम माैन आहे की, विचारण्याचं कुठलं विघ्नही नसतं.
 
तेव्हा कृष्ण जे म्हणताे आहे की ज्ञानविज्ञानांनी तृप्त याचा अर्थ-सर्व ज्ञानविज्ञान समजून घेतलं असा नाही. तर याचा अर्थ असा आहे की जाणण्याचा सारा प्रयत्नच मुळी व्यर्थ आहे हे जाणणे. जाणण्याचा सर्व प्रयत्न व्यर्थ आहे हे जाणणे. सर्व कुतूहले व्यर्थ जाणणे, सर्व विचारणे व्यर्थ आहे हे जाणणे. फ्यूटीलिटी, व्यर्थता कळून चुकली की काही विचारल्याने कधी काही मिळत नाही. फिलाॅसाॅफी आणि धर्म यातला तर फरक आहे. तत्त्वज्ञान आणि धर्म यामध्ये हाच फरक आहे.तत्त्वज्ञ विचारीतच राहतात. ही वृद्ध झालेली मुलं आहेत. त्यांचं बालपण अजून संपलेलं नाही.ते विचारीतच राहतात. ते विचारतात हे जग काेणी बनवलं? ज्यानं बनवलं त्याला काेणी बनवलं ? पुन्हा त्यालाही काेणी बनवलं ? आपण हा वेडेपणा करत आहाेत,