अर्जुनाच्या प्रेमामुळे आपण बाेलते झालाे आहाेत, हे स्पष्ट केल्यानंतर भगवंत एकदम म्हणतात की, अर्जुना, तुझ्यापुढे मी उभा आहे म्हणून मी तेवढाच आहे असे समजू नकाेस. मी म्हणजे सर्व विश्व आहे.माझे हे रूप वेदांना जाणता आले नाही. मन व प्राण यांची गती चालेनाशी झाली. चंद्र व सूर्य हे माझ्या स्वरूपी रात्रीशिवाय मावळले. पाेटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आईचे वय जाणतनाही,त्याप्रमाणे सर्व देवांना माझे ज्ञान हाेत नाही.पाण्यात राहणाऱ्या माशांना समुद्राचे माप कळत नाही. चिलट आकाश ओलांडू शकत नाही. त्याप्रमाणे माेठमाेठे ॠषी व मुनी मला जाणू शकत नाहीत. मी काेण आहे, केवढा आहे, काेणापासून उत्पन्न झालाे, केव्हा व्यक्त झालाे, या प्रश्नांचा निर्णय घेण्यात कित्येक युगे निघून गेली.
अर्जुना, मला समजावून घेणे या सर्वांना अवघड आहे. पर्वतावरून काेसळलेले पाणी पुन्हा वर जाईल. शेंड्याकडे वाढणारे झाड पुन्हा मुळाकडे वळेल, तरच माझ्यापासून निर्माण झालेले जग मला जाणू शकेल. वडाच्या अंकुरात वडाचे विस्तीर्ण झाड सापडेल, परमाणूंत पृथ्वी सापडेल तर कदाचित ॠषींना व देवांना माझी ओळख हाेण्याची शक्यता आहे. जाे अंतर्मुख हाेऊन पाहताे, शुद्ध आत्मज्ञानाच्या याेगाने जाे माझे जन्मरहस्य जाणताे, मी आरंभाच्या पलीकडे असूनही सर्व लाेकांचा ईश्वर आहे असे जाे जाणताे, ताे मनुष्याच्या आकारात आलेला माझाच अंश आहे. ताे म्हणजे ज्ञानाची चालती मूर्ती आहे. त्याचे अवयव म्हणजे सुखाला ुटलेले काेंब आहेत.त्याच्या ठिकाणी दिसणारा मनुष्यपणा हा लाेकांच्या दृष्टीला हाेणारा भास आहे.ताे शरीरधारी असला तरी इतरांपेक्षा वेगळा असताे.