स्वधर्माचे आचरण कसे करावे याचे आणखी विवरण करताना श्रीकृष्ण म्हणतात की, जनकादिकांचे दाखले कशासाठी घ्यावेत? मी स्वत:च अजूनही कर्मयाेगी आहे. हे अर्जुना, तुझ्या ध्यानात आले नाही का? तसे पाहता मला काय कमी आहे? माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मी धर्माचरण करीत आहे.सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने मी संपन्न असल्यामुळे या जगात आता काही मिळवावे असे मला उरलेच नाही हे तूही जाणताेस. श्रीकृष्णांचे गुरू सांदीपनी हाेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंना त्यांनी गुरुदक्षिणा विचारली. तेव्हा त्यांनी आपला नाहीसा झालेला पुत्र आणून द्यावा अशी इच्छा प्रकट केली.गुरूंच्या ह्या इच्छेस अनुसरून सांदिपनींचा मुलगा श्रीकृष्णांनी माेठे परिश्रम करून आणून दिला. याचे स्मरण अर्जुनाला देऊन ते म्हणतात,‘अर्जुना, हा माझा पराक्रम तू पाहिला आहेसच.’
या धर्माचे आचरण सर्वांनी कसे करावे हे सांगताना श्रीकृष्ण एक उदाहरण देतात. एखादा कामी पुरुष आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून जसा तत्पर असताे, तेवढ्या दक्षतेने पुरुषाने आपली कर्मे करावीत. नाहीतर सर्व काही आपल्या स्वाधीन आहे, असे समजून आपण धर्म साेडून वागू लागलाे तर लाेक यथेच्छ स्वैर वर्तन करतील. तसे हाेऊ नये, म्हणून आम्हीही आत्मस्थितीत लीन असतानाही प्रजेसाठी स्वधर्म आचरीत असताे.आम्ही जसे वागताे तसे लाेक वागतात. म्हणून आम्हीच जर धर्म साेडून दिला, कर्तव्यकर्म आचरले नाही तर सर्व समाजव्यवस्थाच नाहीशी हाेईल. म्हणून अर्जुना, जाे थाेर पुरुष आहे, ज्याने परमात्मा प्राप्त करून घेतला आहे, त्याने तर स्वधर्माचा त्याग कधीही करू नये. ताेच जर स्वधर्माकडे दुर्लक्ष करील तर इतर लाेकांना मार्गदर्शन करणारे काेणतेच तत्त्व वा काेणताच मार्ग उरणार नाही.