ऐसें हें गहन। अर्जुना माझें भजन।। आतां ऐकें सांगेन। जे करिती एक।। 9.219

    06-Jan-2023
Total Views |
 
 

Dyneshwari 
 
ईश्वराचे भजन करणाऱ्याचे व त्यांच्या मनाेवृत्तीचे सूक्ष्म वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे.ज्या ठिकाणी ईश्वराचे गुणवर्णन हाेते, भक्तांना देहकालाचे भान राहत नाही, ते कीर्तनरूपच हाेऊन जातात.अशा भक्तांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. कृष्ण, विष्णू, हरी, गाेविंद या नावांनी संपन्न झालेली पदे त्यांच्या मुखांत नित्य असतात. ते नेहमी आत्मचर्चेत रमलेले असतात. माझे गुणगान करीतच ते सर्व विश्वात संचार करीत असतात अशा भक्तांचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर याेगी पुरुषाचे दर्शन भजन रूपाने घडवतात. यांचे भजन कसे असते? तर हे याेगी पुरुष अंत:करणातील परमात्म्याला जतन करण्यासाठी पंचप्राण व मन यांना मार्गदर्शन करतात. इंद्रियांची ओढ विषयांकडे जाऊ नये म्हणून ते शरीराच्या आतबाहेर यमनियमांचे काटेरी कुंपण करतात.
 
मूळबंधांचा परकाेट तयार करून त्यावर जागृत झाल्यावर ते उर्ध्वमुखी हाेऊन सतराव्या कलेचे अमृत प्राशन करतात. त्यांच्या मनात विकाराला स्थानही रहात नाही. प्रत्याहार, धारणा, पंचमहाभूतांची आटणी इत्यादी सैन्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचे व्यापार बंद पडतात. मग आम्ही जिंकले रे जिंकले म्हणून ध्यानाचे आवाज निघतात. तन्मयतेचे एक छत्र फडकू लागते. समाधिजलाने आत्मानुभवाच्या राज्यसुखावर त्याला नंतर अभिषेक हाेताे. अर्जुना, अशा रीतीने माझे हे भजन अत्यंत अवघड व कष्टकारक आहे. आणखीही काही लाेक इतर मार्गांनी माझे भजन करतात.