कहीं एकाधेनि वैकुंठा जावे। तें तिंही वैकुंठचि केलें आघवें।। ऐसें नामघाेषगाैरवें। धवळलें विश्व।। 9.203

    04-Jan-2023
Total Views |
 
 

Dyneshwari 
 
आपण निराकार आहाेत, निर्गुण आहाेत, अव्यस्त आहाेत असे भगवंत अनेकदा सांगत असले तरी आपल्या भक्ताच्या लाेभासाठी आपणांस वारंवार सगुण रूप धारण करावे लागते, असाही निर्वाळा ते देताना दिसतात. माेक्षसुखाला तुच्छ मानणाऱ्या भक्तांच्या प्रेमासाठी भगवंतांना प्रकट व्हावे लागते. जे महात्मे असतात, दैवी प्रकृतीचे असतात, ते भगवंतांचे निर्गुण रूप जाणतात. प्रत्यक्ष भगवंतच हाेऊन ते त्यांच्या सगुणरूपाची सेवा करतात. या सेवेचे काैतुक ज्ञानेश्वर माेठ्या प्रेमभावनेने करतात.असे हे भक्त ईश्वराचे स्मरण कसे करतात? ध्यानधारणा, तपस्या, यज्ञयागादि कर्मकांड यांत न गुंतता भक्त फक्त अखंड नामस्मरण मात्र करतात. भगवंतांच्या कथा ऐकतात. त्यांचे कीर्तन ऐकून तृप्त हाेतात. त्यांच्या या आचरणामुळे पापाचे नावच नाहीसे हाेते. म्हणून प्रायश्चित्तांची गरजच उरत नाही.
 
गीतेने व ज्ञानेश्वरीने भक्तजनांना दिलेली ही सर्वांत माेठी देणगी आहे. यापूर्वी ज्या पापाचे भय वाटे ते पापच येथे नाहीसे झाले आहे. केवळ भगवंतांचे स्मरण करून प्रेमसुखात रंगता येते. यम-दम, मनाेनिग्रह, इंद्रियनिग्रह यांनाही नामस्मरणाने अवकळा आणली.
विविध प्रकारची तीर्थे त्यांच्या स्थानांवरून उठविली.म्हणजे त्यांचे माहात्म्य कमी केले. यमलाेकात जाणे व तेथून परत येणे उरले नाही. यम म्हणताे मी काेणाचा निग्रह करावा? तीर्थे म्हणतात येथे औषधालाही दाेष नाही. एका नामस्मरणाचा घाेष केला की जगातील सर्व दु:खे नाहीशी हाेतात. सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते. असा हा विष्णूचा उपासक वैकुंठालाच पृथ्वीवर घेऊन येताे. यापूर्वी कधीकधी एखादा मनुष्य पृथ्वी साेडून वैकुंठाला गेला असेल वा नसेल.