एवढेच नव्हे तर ते म्हणतात की जी जी सुपात्र आणि सत्पात्र म्हणजेच वंदनीय असलेली व्यक्ती दिसेल तिच्या ठायी नम्र हाेऊन नमस्कार करण्यास विलंब लावू नये. येथे ते ‘वेगी’ म्हणजे लगबगीने नमस्कार घालावा अशा अचूक व अर्थपूर्ण शब्दाचा उपयाेग करतात. ज्या व्यक्तीच्या अंगी आपणांस घेण्यासारखे गुण आढळतील त्या व्यक्तीकडून ते गुण घेण्याचा, ज्ञान ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या नात्याने ती व्यक्ती आपली गुरूच हाेते व म्हणून तिच्या ठायी गुरुपद जाणून तिला मनाेभावे आणि आदरपूर्वक नमन केले पाहिजे. या नमनामागे शरणभाव आवश्यक आहे.अन्यथा ‘‘देखल्या देवा दंडवत’’ या म्हणीसारखी आपली स्वत:चीच फसवणूक हाेईल व प्रगतीसाठी त्या नमनाचा काहीच उपयाेग हाेणार नाही.आपल्या सभाेवती पाहिले तर गणपती, शारदा, शंकर, श्रीकृष्ण, विष्णू अशा देवदेवतांच्या मूर्ती त्यांच्या मंदिरात दृष्टीस पडतात. त्यामुळे भक्ताला साहजिकच असा प्रश्न पडेलकी, इतक्या देवांपैकी मी काेणाला वंदन करून वंदनभक्ती करू.
श्रीदासबाेध हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. त्यामुळे शिष्यांच्या आणि श्राेत्यांच्याही मनांत ही शंका येणार हे जाणून श्रीसमर्थ सांगतात की, ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जरी नदी, नाले, तळी असे काेठेही पडले तरी ते वाहत जाऊन शेवटी सागरासच मिळते, तसेच काेणत्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी परमेश्वरालाच पाेहाेचताे. त्यामुळे काेणत्या देवदेवतेला नमस्कार करू हा प्रश्नच मनात येऊ देऊ नका. काेणत्याही देवाला; पण पूर्ण भाव ठेवून, मनात नम्रता आणून, आपला अभिमान साेडून आणि पूर्ण शरणभावाने नमस्कार करा.ताे त्या जगन्नियंत्याला निश्चित पाेहाेचेल आणि त्याचे फळस्वरूप म्हणून त्याची कृपा तुम्हाला प्राप्त हाेईल याची नि:शंकपणे खात्री बाळगा. ही खात्री, ही निष्ठा मनात ठेवून जाे वंदनभक्ती करेल त्याची भक्ती फलद्रूप हाेईल हे निश्चित! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299