सत्याला, तसेच नीतीनियमाला अनुसरून केले जाणारे काेणतेही कार्य हे पवित्र कार्य असते. तरीपण परंपरेने आपण काही विशिष्ट कार्यांना पवित्र कार्य म्हणून संबाेधताे. अशी पवित्र असणारी कार्ये ही पवित्र मनाने, पवित्र भावनेने स्नान आदी करून केली जावीत, अशी अपेक्षा केली जाते. शरीराची, मनाची पवित्रता भावनेच्या पावित्र्याला बळकटी देते.भावनेच्या पावित्र्याची बळकटी पवित्र कार्याच्या पावित्र्याला पुष्टी देते. अर्थात मुळात पवित्र असणाऱ्या कार्याचे पावित्र्य हे माणसाच्या पवित्र मनाने, पवित्र शरीराने, पवित्र भावनेने वाढते. मन आणि भावनाच पवित्र नसतील, तर शरीराला कितीही धुतले, तरी पावित्र्य निर्माण हाेण्याचे कारण नाही.
संसारात अडकलेला जीव एखादे पवित्र कार्य करतानाही जर तना-मनावर ईर्षा,द्वेष, मत्सर, काम, क्राेध, लाेभ, अहंकार, मीपणाच्या अपावित्र्याचे पांघरून घेत असेल, तर त्याला त्या कार्यातून खरे समाधान मिळू शकत नाही.पवित्र कार्यासाठी तनामनाच्या, भावनेच्या पावित्र्याची उपलब्धता नसेल, तर वेदासारख्या पवित्र ग्रंथाचे अक्षर घाेकण्याचा अधिकार असण्याचे कारण नाही. या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, नाही अधिकार । कांही घाेकाया अक्षर ।। महाराजांच्या अभंगाकडे सकारात्मकतेने पाहिले तर खूप सुंदर अर्थ आपल्या लक्षात येऊ शकतील, असे आम्हास वाटते. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448