आपल्या भक्ताचे माहात्म्य श्रीकृष्ण येथे वर्णन करीत आहेत.भक्ती जर नसेल तर जिवंत राहण्यात काय अर्थ ? ज्ञानेश्वर दृष्टांत देतात की, हिवराच्या झाडाखाली जसे नेहमी वाईट विचार येतात, तसे अभक्ताच्या संगतीत पुण्य टिकू शकत नाही. कडुलिंबाच्या फळांचा माेसम आला की कावळ्यांना सुकाळ हाेताे.उत्तम पक्वान्नाचे ताट चव्हाट्यावर ठेवल्यावर ते जसे कुत्र्यांना उपयाेगी पडते, त्याचप्रमाणे भक्तिहीन अशा माणसापुढे संसारदु:खाचे ताटच असते. म्हणून माझ्या भक्ताचे कूळ उत्तम असाे वा नसाे, ताे जातीने अंत्यज असला तरी चालेल, त्याचा देह पशूचा असला तरी चालेल, पण माझी भक्ती असली की पुरे, अर्जुना, पहा ना.
नक्राने धरलेल्या गजेंद्राचा उद्धार मीच केला. माझ्या प्राप्तीमुळे त्याचे पशुत्व व्यर्थ ठरले.अर्जुना, एवढेच नव्हे तर जाे अध ांतला अधम आहे, जाे पापयाेनीत जन्माला आला आहे, जाे दगडाप्रमाणे मूर्ख आहे, पण ज्याची वाणी माझ्या ठिकाणी दृढ आहे. ज्याचे कान माझीच कीर्ती ऐकतात, ज्याची सर्व इंद्रिये माझ्याकडेच लागलेली आहेत, असे माझे भक्त मला नेहमीच प्रिय हाेतात.अर्जुना, जिवंत राहून प्रेमाचा सर्व जिव्हाळा त्यांनी मलाच अर्पण केलेला असताे. ते पापयाेनीत जन्मलेले असाेत, त्यांनी अध्ययन केलेले नसाे किंवा वेदांचे श्रवण केलेले नसाे. पण त्यांची व माझी तुलना केली असता ते तुलनेत काेठेही उणे पडत नाहीत. भगवंतांनी दिलेली ही ग्वाही मतिमंदांना, हीन जातीच्या लाेकांना विशेष महत्त्वाची वाटेल. केवळ परमात्म्याचे स्मरण मनाेभावे केले की त्यांना त्याची प्राप्ती हाेते.