येतुलेनि अनामा नाम। मज अक्रियासि कर्म। विदेहासि देहधर्म। आराेपिती।। 9.156

    02-Jan-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
आपले स्वरूप मूलत: कसे आहे याचे विवेचन भगवान श्रीकृष्ण येथे करीत आहेत. ते असे सांगतात की, अज्ञ मनुष्य मला देहधारी जीव समजतात. तापाने ताेंड दूषित झाले की, दूधही कडू लागते.त्याप्रमाणे अज्ञ लाेकांचे असते. अर्जुना, म्हणूनच तुला सांगताे की, स्वप्नात अमृत पिऊन मनुष्य कधी तृप्त हाेत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे स्थूलदृष्टीने पाहून मी कधी समजणार नाही. माझे सच्चिदानंदरूप न जाणता लाेक मला पंचमहाभूतात्मक समजतात.पाण्यात पडलेल्या नक्षत्रांना रत्ने समजून हंस पाण्यात पाय टाकून जसा फसताे, त्याप्रमाणे या लाेकांचे असते.मृगजळाला गंगा समजून स्नान केल्यास कधी फळ मिळेल काय? बाभळीच्या झाडाखाली बसून ते कल्पतरू’ मानल्यास कधी इच्छापूर्ती हाेईल काय? नीलमण्यांचा हार समजून सर्पाला हाती धरावे काय?
 
साेन्याचा ढीग समजून तप्त निखारे हाती धरावेत काय? त्याप्रमाणे भाैतिक प्रपंच म्हणजेच परमात्मा आहे व श्रीकृष्ण हा भाैतिक आहे असे समजावे काय? पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबास प्रत्यक्ष चंद्र मानावे काय? त्याप्रमाणे मनुष्याने ईश्वरास भाैतिक मानणे व्यर्थ आहे.मी नाशवंत, दृष्य, स्थूल आहे असे काेणी मानू नये.उत्तम याेद्ध्या अर्जुना, काेंडा कांडल्याने कधी धान्यकण मिळेल काय? ेस पिण्याने पाण्याची तृप्ती हाेईल का? म्हणून भ्रांत मनाने स्थूल प्रपंचात्मक असे माझे सगुणस्वरूप आहे असे अज्ञानी लाेक मानतात. मी नामरहित असून मला नाम ठेवतात. अकर्ता असून कर्ता मानतात. निराकाराला साकार मानतात. मी उपाधिरहित असून मला विविध उपचारांनी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात.