चांगल्यांचे अनुकरण केल्यावर चांगुलपणा हा काही प्रमाणात का हाेईना वाढताेच.त्याचबराेबर केव्हा केव्हा चांगले असल्याचे भासविण्याच्या प्रयत्नात किंवा चांगल्यांचे नाटक करण्याच्या नादात कांही प्रमाणात का हाेईना, पण मन गुरफटून जाते. अर्थात चांगल्याचे नाटक, वेष, चांगल्यांचा सहवास आपणाला चांगले वागायला लावताे. रामायणातील एक उदाहरण याप्रसंगी सांगणे याेग्य वाटते. रावणाला सीता वश हाेत नव्हती. तेव्हा एका दासीने रावणाला श्रीरामचे रूप धारण करून सीतेला वश करण्याचा सल्ला दिला. रावणाने तत्काळ श्रीरामाचे रूप धारण केले आणि सीतेकडे चालू लागला. रावणाला प्रत्येक पाऊल जड चालले. प्रत्येक पावलाला रावणाचे मन म्हणू लागले की राम फसवा नाही. आपण रामाच्या रुपात सीतेला फसवणे याेग्य नव्हे. म्हणून त्याने या रुपातून माघार घेतली.
चांगल्याचे रुप जर एवढे परीवर्तन करू शकते तर त्याचे दास्यत्व, त्याचा सहवास आपल्यात परिवर्तन केल्याशिवाय राहीलच कसा? कडू म्हणून साखर खाल्ली, तरी ती गाेडच लागते. त्याप्रमाणे काेणत्याही भावनेने चांगल्यांचा सहवास, दास्यत्व केले, तरी परिणाम हा चांगलाच हाेताे.बऱ्याचवेळा चांगल्यांचा सहवास आपणाला मिळताे; पण आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असताे. त्यामुळे हातून संधी जाणार नाही, याची काळजी घेणे याेग्य असेल. जय जय राम कृष्ण् हरी. - डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448