धन, संपत्ती प्राप्त व्हावी, आपणाला लाेकांनी माेठे म्हणावे, आपण श्रीमंत व्हावे, सुख समाधान लाभावे असे प्रत्येक जीवाला वाटत असते.पण श्रीमंतीची, भाग्याची, सुख समाधानाची ज्याची त्याची परीभाषा ही वेगळी असते.काेणाला धनाच्या श्रीमंतीचा हव्यास असताे तर काेणाला मनाच्या श्रीमंतीत आनंद असताे.काेणी भाैतिक सुखात आनंदी हाेताे तर काेणी आत्मीक सुखात तल्लीन असताे. भाैतिक सुखासाठी खूप धडपड करावी लागते. प्रसंगानुरुप का हाेईना पैशाची गरज असते.
बऱ्याचवेळा खाेटे बाेलण्याची, इतरांना फसविण्याची, इतरांचे लुबाडण्याची वेळही भाैतिक सुखाच्या प्राप्तीत येते.थाेडक्यात भाैतिक सुखासाठी अनेकदा निती नियमाकडे डाेळेझाक करावी लागते.पण आत्मीक सुखासाठी यापैकी काहीही करावे लागत नाही. तर जे आपणाला लुबाडणार आहेत, अशा ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार आदिंना दूर करावे लागते एवढेच.ज्याला यांना दूर करण्याचे कार्य जमले त्यांच्याकडे खरे सुख समाधान आपाेआप येते. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, देव भाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ।।जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448