मराेन कीर्ती उरवावी। ताे सत्वगुण ।।1।।

    19-Sep-2022
Total Views |
 
 


saint 
 
असा हा दुर्लभ सत्वगुण शरीरात प्रगटला म्हणजे त्या सत्त्वगुणी माणसाचे वागणे, बाेलणे, चालणे आणि कृती कशी आदर्श असते, ते या समासात श्रीसमर्थांनी विविध उदाहरणे देऊन रसाळपणे सांगितले आहे. आंतरिक सुधारणेने माणसाच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक दाेन्ही वागण्यात उत्तमता आली पाहिजे, असा त्यांचा सदैव आग्रह आहे.म्हणूनच सत्त्वगुणी माणसांची केवळ पारमार्थिक प्रगती सांगून ते थांबत नाहीत तर सत्त्वगुणामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारातही कसे उत्तम गुण प्रगटतात, हेही ते समजावून देतात. त्याला भजन, पूजन, कीर्तन अशी भक्तीमार्गाची आवड उत्पन्न हाेते आणि परमेश्वर भेटीची तळमळ लागते.
 
दानधर्म, व्रतवैकल्ये, अन्नदान, तीर्थयात्रा, मंदिरांची स्थापना, तेथे पूजा अर्चा अशा सर्व गाेष्टींनी ताे देवाच्या जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करीत राहताे. जपजाप्य, नित्यनेम, उपवास करून ताे शरीरशुद्धी आणि मनसंयमन करीत असताे.अभिमान साेडून निष्कामपणे देवाचे ध्यानात निमग्न हाेताे. नामस्मरण करावे. हरिकीर्तन ऐकावे, साधुसंतांच्या संगतीत राहावे, त्यांचेविचार ग्रहण करून तसे वर्तन सुधारावे अशी त्याला ओढ लागते. देहाचे भाेग आणि सांसारिक सुखे यांचे नश्वरत्व त्याच्या लक्षात येऊन ताे त्यासंबंधी उदासीन हाेत जाताे. जगात परमतत्त्व एकच आहे व त्यातच आयुष्यातील नरदेहाचे सार्थकत्व आणि परमसुख आहे याची त्याला प्रखरतेने जाणीव हाेते.त्यामुळे विषयसुख साेडून ताे वैराग्य धारण करताे.