सरता संचिताचे शेष। नाही क्षणाचा अवकाश। जाणे लागे ।।2।।

    09-Dec-2022
Total Views |
 

saint 
 
माणसाच्या शरीराला प्रत्येक सेकंदाचे माप लावले आहे आणि ते माप भरत चालले आहे.ते भरले की मृत्यू येणारा आहे आणि मृत्युपाशी आजच्याऐवजी उद्या किंवा परवा अशी उधारी चालणारी नाही. माणसाच्या आयुष्याची लांबी पूर्वजन्मीच्या पुण्याईने निश्चित झालेली आहे आणि ती पुण्याई संपली की क्षणाचाही अवधी न लागता अगदी सेकंद भरला की माणसाला मृत्यूला सामाेरे जावे लागतेच. त्या वेळी काळाचे दूत येऊन तुमचा प्राण हरण करतातच. इतर काेणतेही संकट आले तर आपण दुसऱ्या काेणाच्या मदतीने किंवा त्याच्या पाठीशी लपून त्या संकटापासून सुटका मिळवू शकताे. पैशाची नड आली तर काेणा मित्राकडून उसनवारी करता येते. काेणी दांडगाईने मारायला आला तर एखाद्या पैलवानाच्या पाठीमागे लपून त्याच्या आश्रयाने मार चुकविता येताे.
 
पण मृत्यूचा मात्र एकदा वेढा पडला की तुम्हाला काेणीही पाठीशी घालून त्यापासून वाचवू शकत नाही आणि मृत्यूही असा समचित्त आहे की ताे आपल्या तावडीतून काेणालाही साेडत नाही. प्रत्येक जीवाच्या मागे त्याचा दट्ट्या लागून ताे त्या जीवाला कुटून आपले कर्तव्य पूर्ण करीत असताे. प्रत्येकाला हा दट्ट्या बसणाराच असताे. काेणाला आधी तर काेणाला नंतर एवढाच वेळेचा फरक ज्याच्या त्याच्या आयुष्याच्या दाेरीप्रमाणे हाेत असताे.साधकाला भक्तिमार्गाला प्रवृत्त करण्यापूर्वी त्याला आपल्या आयुष्याची अनिश्चितता पटवून द्यावी हा श्रीसमर्थांचा हेतू आहे. आपण ताे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण त्यातूनच अनित्य जीवनाचे सार्थक कसे करावे या विचाराकडे आपण निश्चितपणे वळू शकू! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299