अध्यात्म, यश, अधियज्ञ, अधिदैविक, आध्यात्मिक, भाैतिक इत्यादी शब्दांच्या जंजाळातून भगवंतांचे बाेलणे नीट स्पष्ट हाेईल का नाही अशी शंका अर्जुनाला आली. अक्षर म्हणजे काय हेही भगवंतांनी समजावून सांगितले. हे अक्षर वादळाने नाहीसे हाेत नाही. ते ज्ञानाने जाणले जाते.पण हे ज्ञान कालमर्यादित असल्याकारणाने ज्ञानही ज्याला जाणू शकत नाही त्याला अक्षर म्हणतात. ते प्रकृतीच्या पलीकडे असून परमात्मस्वरूप आहे.विषयाचे विष हे मारक असल्याकारणाने आत्मघात करणारे आहे. पण विरक्त मनुष्य हे विष टाकून देऊन इंद्रियांना प्रायश्चित्त घडविताे. ताे देहरूपी झाडाखाली स्वस्थ बसताे. असा विरक्त मनुष्य परब्रह्मरूपी वस्तूची नेहमी इच्छा करीत असताे.
निष्काम पुरुषास हे शक्य हाेते. याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचारी पुरुष व्रताचे कष्ट करताे. इंद्रियांविषयी कठाेर हाेताे.त्यांना स्वाधीन ठेवताे. या श्रेष्ठपदाच्या काठावर वेद बुडून गेले आहेत. असे हे दुर्लभ व अत्यंत थाेर पद आहे. ज्यांनी आपल्या प्राणाचा परब्रह्यात लय केला आहे ते या पदाशी ऐक्य पावतात.अर्जुना, या स्थितीचा आणखी परिचय मी करून देईनच. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, ही स्थिती पुन्हा एक वेळ सांगा. असे मी म्हणणार हाेताेच, पण कृष्णा, तुम्ही कृपा केली तरच मला हा प्रश्न सुलभ वाटेल. देवा, हा सर्व विषय अगदी साेपा करून सांगा. माझ्या बुद्धीस आकलन हाेईल असे त्याचे स्वरूप असावे. तेव्हा त्रैलाेक्याचे प्रकाशक भगवान म्हणाले, अर्जुना, मी तुला चांगले ओळखताे.तुझा अधिकार मला माहीत नाही काय? मी संक्षेपानेच व साेपे करून सांगताे.