राम आणि भरत हे आपल्याला आदर्श

    07-Dec-2022
Total Views |
 

Gondavlekar 
रामचरित्र सर्वांग सुंदर आहे.रामाने पितृ-आज्ञा पाळली आणि सकल वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला; या त्याच्या थाेर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग! किती हा संयम! किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लाेभता, काय कर्तव्यनिष्ठा! या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा.काेणी म्हणतील, रामाचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा; पण तसे नव्हे. राम ज्या मार्गाने गेला ताे मार्ग आजही अनुकरणीय नाही का? मातृ-पितृभक्ती, एकपत्नीव्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लाेभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शाैर्य, आदिकरून गाेष्टी आजही आदर्शभूत नाहीत का? सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का? काळ वेगळा असला तरी नीतितत्त्वे सर्वकाळी अबाधितच असतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय हाेय.
 
रामचरित्रात महत्त्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे. पादुकांना साक्ष ठेवून, भरताने अकर्तेपणाने चाैदा वर्षे राज्य केले. तसे आपण प्रपंचात वागावे. म्हणून भरतादिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे.राज्यपदाचा त्याग करून ताे रामपदी रत झाला. हेच त्याचे वैशिष्ट्य. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट; राम-पादुकांना वंदन करावे, प्रत्येक गाेष्ट त्यांना निवेदन करावी, आणि रामस्मरण करून मग ती करावी; असा त्याने राज्यशकट हाकला. तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा, रामाला साक्षी ठेवून करावा, ताे सुखाचा हाेईल.संसार, जग, माता, पिता, जाया, पुत्र, घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा. पुत्र-कलत्र माझे असे म्हणताे, पण खराेखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती. पण तसे करता येत नाही. म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे.
 
लक्ष्मणापेक्षांही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे. चाैदा वर्षेपर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल. प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर ताे बाधणार नाही. जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी हाेय. आपल्याला झाेपेतून हात धरून काेणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे.एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वत:ला पूर्ण विसरून जावे, ‘मी नाम घेताे’ हेदेखील विसरून जावे, हाच खरा परमार्थ हाेय. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, ‘रामा, आता मी तुझा झालाे. ह्यापुढे जे काही हाेईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा मी आटाेकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण.’