जें अपत्य थानीं निगे। तयाची भूक ते मातेसीचि लागे। एऱ्हवीं तें शब्दें काय सांगे। मग स्तन्य दे येरी।। 8.13

    06-Dec-2022
Total Views |
 
 
 
 
Dyaneshwari
 
प्रत्येक अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर बहुधा नमनाने करतात.या नमनात कधी गुरूंची, कधी श्राेत्यांची, कधी श्रीकृष्णांची स्तुती असते. या आठव्या अध्यायांत श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रेमाचे सुंदर वर्णन आले आहे.प्रारंभीच अर्जुन म्हणताे की, देवा, आत्तापर्यंत तुमचे म्हणणे मी ऐकले; पण याेग्य असे निरूपण तुम्ही करावे. ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशास म्हणतात? अध्यात्म म्हणजे काय? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मला समजतील अशा भाषेत द्या. देवा, अधिभूत म्हणजे काय? अधिदैवत म्हणजे काय? अधियज्ञ कशास म्हणावे? हे सर्व तुम्ही मला सांगावे.अर्जुनाच्या या प्रश्नाने भगवान संतुष्ट झाले.या भगवंतांचे वैशिष्ट्य असे की, ते स्वप्नात जरी बडबडले तरी व्यर्थ हाेत नाही.
 
अर्जुनाचे प्रश्न ऐकून देव त्याला म्हणाले, अर्जुना, तू विचारीत आहेस तेच मी तुला सांगत आहे.तू लक्ष देऊन ऐक. अर्जुना, तू कामधेनूच्या वासराप्रमाणे आहेस. तुझ्यावर कल्पतरूचा मांडव आहे. त्यामुळे तुझ्या मनाेरथांची सिद्धी हाेईल यात नवल नाही. अरे, मी ज्याला मारताे, ताेसुद्धा मला म्हणजे परब्रह्माला येऊन कसा मिळणार नाही? कारण आपण कृष्णरूप झालाे की नेहमी आपला केलेला संकल्प सिद्धीस जाताे. अंत:करण कृष्णरूप करून साेडणारे असे भगवंतांचे नि:सीम प्रेम अर्जुनाच्या ठिकाणी हाेते, म्हणून त्याची सर्व इच्छा सफल हाेते.त्याच्या मनात जे आहे ते ओळखून भगवान श्रीकृष्ण अगाेदरच त्याच्यापुढे आणून ठेवतात.हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वर आईचा एक रम्य दृष्टांत देतात, स्तनपान करणाऱ्या बाळाची भूक प्रथम आईलाच लागते. एरवी ते कधी आईला सांगते का? आणि नंतर ती त्याला पाजते का?