ऐका नवविधा भजन। सत्शास्त्री बाेलिलें पावन। हाेईजे येणे ।।2।।

    30-Dec-2022
Total Views |
 
 
हा भाव आणि अनन्य भ्नती व निरूपम प्रेम निर्माण हाेण्यासाठी श्रीसमर्थ म्हणतात की, साधकाने कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, याेगमार्ग, वैराग्यमार्ग असे जे विविध मार्ग आहेत; त्यांचे ज्ञान श्रवण करावे.त्याचबराेबर दान, तप, तीर्थाटन, व्रतवैकल्ये, मंत्रसाधना आणि पुरश्चरणे ऐकावीत. वेगवेगळे तापसी विविध प्रकारचे तप करीत असतात. काेणी नुसत्या दुधावर, काेणी पाण्यावर, काेणी फळावर, तर काेणी निराहार राहतात.काेणी हटयाेगी, काेणी अघाेरपंथी, काेणी निग्रही, काेणी तापसी असेही याेगी असतात. त्या सर्वांचेही वर्णन व अनुभव ऐकावेत. श्रीसमर्थांचा ज्ञानार्जनावर माेठा भर आहे.त्यांनी स्वत: किती अनंत विषयांचे अगाध ज्ञान मिळविले हाेते हे त्यांच्या शब्दाशब्दांमधून प्रत्ययास येते. त्यामुळेच ते साधकाला सांगतात की भूगाेलरचना, सृष्टीरचना, जीवरचना, खगाेलशास्त्र, ग्रहतारे, सूर्यमालिका यांचे ज्ञानही श्रवण करावे.
 
पृथ्वीला नऊ खंडे असलेली अशी नवखंड पृथ्वी म्हणतात त्या सर्व खंडांची, अष्टदिशांच्या देवतांच्या स्थानांची, वने, महाअरण्ये या सर्वांचे ज्ञान करून घ्यावे.‘‘धन्य ते गायनी कळा’’ म्हणणाऱ्या श्रीसमर्थांना विद्या व कला दाेन्हींचेही प्रेम आणि ज्ञान हाेते. भ्नती करताना ती कलांच्या उपासनेतूनही करता येते हे विशद करताना ते म्हणतात की, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर एवढेच नव्हे तर संस्कृत नाट्यशास्त्रामधील अष्टनायिका आणि संगीतशास्त्र हेही श्रवण करावे. त्यामधील राग, ताल, वादन, नर्तन व जीवनातील प्रसंगज्ञान ऐकत जावे.जगामध्ये एकूण चाैदा विद्या आणि चाैसष्ट कला आहेत, त्याही अभ्यासाव्यात आणि उत्तम पुरुषाची बत्तीस लक्षणे शास्त्रात सांगितलेली आहेत ती लक्षणे आणि हस्तसामुद्रिक व ज्याेतिषविद्या यांचेही मनाेभावे व ज्ञान व्हावे म्हणून श्रवण करावे. एकूणच श्रीसमर्थांच्या मते भ्नत म्हणजे बावळट व अज्ञानी नसताे तर ताे सर्व विद्या, कला आणि ज्ञान यांत पारंगत असूनही अंतिमत: भगवंतप्राप्ती हेच आयुष्याचे ध्येय मानून त्यासाठी श्रवणभ्नती मार्गाचा आधार घेताे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299