तुका म्हणे हें राेकडें । लाभा अधिकारी चाेखडें ।।

    03-Dec-2022
Total Views |
 

saint 
 
असत्य, खाेटेपणा, स्वार्थ आदिमध्ये अडकलेल्या जीवांना कधी कधी सत्य, खरे पटत नाही. तेव्हा अनेकांना हेच खरे, हेच सत्य आहे हे पटवून दाखवावे लागते. सत्य हे सत्यच, खरे हे खरेच असले, तरीही असत्यात, खाेटेपणात वागणाऱ्यांना सत्य, खरे हे सहजासहजी पटत नाही. अयाेग्य असूनही आपण करताे तेच याेग्य आहे, अशी खात्री बाळगणाऱ्यांना प्राप्तीची अपेक्षाही जास्त असते. चांगले बीज पेरलेच नाही, तर चांगले उगवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे सत्य असले तरीही मीपणा, अहंकार, स्वार्थ आदीची जाेपासणूक करणाऱ्यांना त्यांचेच खरे वाटत असते. असे लाेक ईश्वरभक्तीसुध्दा वरवरची करतात. ईश्वराला लालूच दाखवतात. तू मला फलाणे- फलाणे दे मग मी तुला फलाणे फलाणे देईन, असे सर्रासपणे हे लाेक भगवंताला म्हणतात.
 
त्यांच्याकडून हाेणारी भक्ती ही व्यावहारिक असल्याने त्यांना काही प्राप्त हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, जे लाेक/भक्त नि:स्वार्थ आहेत, ज्यांच्याकडे शुध्द भाव आहेत, ज्यांची भगवंताप्रति (जीवमात्राप्रति ) शुद्ध श्रद्धा आहे, ते इच्छा नसतांनाही आपाेआप खऱ्या लाभाच्या अधिकारास पात्र हाेतात. हे उघडपणे सत्य आहे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हे राेकडें । लाभा अधिकारी चाेखडें ।। जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448