वाचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे.पांडुरंगाला मनात स्थान नाही दिले तरी किमान वाचेने त्याचे नाव घ्यावे, या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, नसें तरी मनीं नसाे । परी वाचे तरी वसाे ।। कांही वेळेस आपण मनात नसतानाही ओघा ओघात किंवा समाेरच्याला बरे वाटावे म्हणून किंवा एक प्रकारे समाेरच्याची अवहेलना करावी म्हणून जरी चांगल्यांच्या नावाचा उच्चार केला तरी त्याचा परिणाम चांगलाच झाल्याचे आपल्या लक्षात येते.उदाहरणादाखलच बाेलायचे झाले तर मी माझ्याच बाबतीत सांगेन. काही लाेक प्रेमाने, आदराने मला माऊली म्हणतात.काही लाेक मला बरे वाटावे म्हणून माऊली म्हणतात, तर काही लाेक एक प्रकारे माझी टिंगल म्हणून माऊली काय चाललयं असे म्हणतात.
मी फक्त एवढाच विचार करताे की, माझी माऊली म्हणून घेण्याची पात्रता नाही. तरी पण काेणी काेणत्याही भावनेतून का हाेईना मला माऊली म्हटले तरी त्यांच्या मुखातून माऊली हा मायेचा शब्द बाहेर पडताे आहे आणि ऐकणाऱ्यांच्या कानात माऊली शब्द जाताे आहे. अर्थात, क्षणभर का हाेईना माऊलीमय वातावरण तयार हाेत आहे आणि माऊली त्यांच्या डाेळ्यासमाेर उभे राहत आहेत. यातच माझी अपेक्षा पूर्ण हाेते, म्हणून मी माऊली या शब्दाचा मन:पूर्वक स्वीकार करताे. साखर कडू म्हणून खाल्ली तरी ती गाेडच लागते, त्याप्रमाणे काेणत्याही भावनेने माऊली म्हटले तरी या शब्दाचा गाेडवाच जाणवेल. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448