हात राखून भक्ती केली तर फळ देतानाही भगवंत न्यून ठेवूनच देईल. अनेकदा भक्ती व कृपा याला ध्वनी आणि प्रतिध्वनीचीही उपमा दिली जाते. आपण मधुर ध्वनी केला तर प्रतिध्वनीही मधुरच येईल आणि आपण अपशब्द बाेललाे तर प्रतिध्वनी म्हणून आपणास अपशब्दच ऐकू येतील. म्हणूनच श्रीसमर्थ सांगतात की, भगवंताच्या कृपेचे सूत्र आपणा स्वत:जवळच आहे.भक्ताचा भाव संपूर्ण असेल तर कृपाही संपूर्ण मिळेल, हे निश्चित आहे. त्यासाठी आपण निरतिशयपणे आणि पूर्ण श्रद्धेने भक्ती करावी, असेच त्यांचे सांगणे आहे.जे अशी भक्ती करतात त्यांना ईश्वर प्रसन्न हाेताे हे निश्चित आहे. एखादे बी पेरले तर ते उगवून फळ मिळेलच याची खात्री नसते; पण भक्तीच्या बीजाचे वैशिष्ट्य असे की ते कधीच वाया जात नाही.
भगवंत कृपेचे फळ निश्चितपणे प्राप्त हाेते आणि अशा माणसाच्या भक्तीमुळे केवळ ताेच नाही तर त्याचे पूर्वजही उद्धरून जातात.
शिवाय त्याच्या संगतीने इतर अनेक जणही भ्नितमार्गाला लागतात. हाच भक्तीचा अमाेघ महिमा आहे. अशा भक्तामुळे त्याची माता आणि सर्व कुलही धन्य हाेऊन जाते आणि अशा भक्तांचा कैवारी असणारा भगवंत कृपावंत हाेऊन त्यांना सदैव आधार देताे, त्यांच्यावरील संकटांचा परिहार करताे आणि अंती त्यांना माेक्षप्राप्तीचा मार्ग दाखविताे. म्हणून प्रत्येकाने अशी अनन्यभक्ती करून मनुष्यजन्म सार्थकी लावलाच पाहिजे.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299