ज्ञानेश्वर महाराज आपण धिटाई का केली याचे समर्थन विविध अंगांनी करीत आहेत. संवादसुखाचा श्राेत्यांकडून अनुकूल वारा वाहू लागला तर निरूपण करणाऱ्या वक्त्याच्या चित्तात परमात्मप्रेमाचे मेघ जमू लागतात आणि श्राेता जर दुश्चित्त असेल तर निरूपणातला रस नाहीसा हाेईल. अहाे, चंद्रकांत मणी पाझरताे खरे आहे, पण त्याला द्रव ाेडण्याची कला फक्त चंद्राच्या ठिकाणीच आहे. म्हणून एकाग्रतेने श्रवण करणारे श्राेते असल्याखेरीज वक्त्याचे बाेल उचंबळून येत नाहीत. आम्हांला गाेड करून घ्या अशी प्रार्थनाजेवणाऱ्यास कधी तांदुळांनी करावी का? आम्हांस चांगले नाचवा अशी प्रार्थना कळसूत्री बाहुल्यांनी सूत्रधाराला कधी केली आहे का? ज्ञानेश्वरांची एवढी काकुळती ऐकून निवृत्तिनाथ म्हणतात की, अरे बाबा, चिंता कसली करताेस ?
तुझे सर्व म्हणणे मान्य आहे. आत श्रीकृष्णांनी अर्जुनास जे सांगितले ते सांग म्हणजे झाले.सद्गुरुनाथांचे हे बाेलणे ऐकून ज्ञानेश्वर संतुष्ट झाले आणि म्हणाले, मी श्रीकृष्ण काय म्हणाले तेच सांगताे.ते म्हणाले, अर्जुना, तुझे अर्जुन हे नाव आस्थादायक व श्रद्धापूर्ण आहे. तू सांगितलेल्या गाेष्टींचा मी कधीच अनादर करणार नाही. म्हणून तर मला ज्ञानाचे गुप्तपण दूर करावे लागले. बाेलण्याजाेगे नाही ते बाेलावे लागले.अंत:करणातील गुप्त गाेष्ट तुझ्या अंत:करणात प्रविष्ट करावी लागली.या संदर्भात ज्ञानेश्वर एक उत्तम मार्मिक दृष्टांत देत आहेत की दूध स्तनांत असले तरी आईला त्याची काय गाेडी? आपल्यावर विसंबून असणाऱ्या लडिवाळ लेकराने ते दूध प्याले की आईची इच्छा पूर्ण हाेते.