ओशाे - गीता-दर्शन

    22-Dec-2022
Total Views |
 
 
 

Osho 
 
एक अंतर निर्माण केले पाहिजे. त्याने हे जाणले पाहिजे की मी डाेळा नाहीये.डाेळ्याच्या मागे वेगळा असा काेणीतरी ताे मी आहे.डाेळ्याने मी पाहताे हे खरे, पण डाेळे पाहत नसतात. तर पाहणारा काेणी वेगळाच आहे. डाेळे बिलकूल पाहू शकत नसतात.डाेळ्यांमध्ये पाहण्याची काहीएक क्षमता नाही. डाेळे म्हणजे फक्त झराेके, एक खिडकी, एक पॅसेज. एक मार्ग पाहण्याची जेथून साेय हाेते असे ठिकाण. जणू खिडकीजवळ आपण उभे असता आणि हळूहळू म्हणू लागता की, खिडकी आकाश पाहत आहे.
हे तसेच वेडेपण आहे. आपला डाेळा ही आपल्या शरीराची फक्त खिडकी आहे. तिथून आपण बाहेरच्या जगात डाेकावता, शरीरात मन असते त्याच्याही आत चेतना असते. ती पाहणारी आहे.डाेळे पाहत नसतात.आपल्यालाही कधी याचा अनुभव आला असेल. एक जण रस्त्यातून पळत चालला आहे.त्याच्या घराला आग लागलेली आहे... त्याला नमस्कार करा तरी त्याच्या लक्षातही येत नाही.
 
त्याला विचारा. ‘काय कसं काय चाललंय?’ ताे काहीएक उत्तर देत नाही. ताे तर पळत सुटलाय त्याला हा प्रश्न ऐकूही येत नाहीये. दुसऱ्या दिवशी त्याला भेटा आणि विचारा. ‘काय हाे. काय झालं हाेतं काल? तुम्हाला हटकलं हाेतं मी. नमस्कार पण केला हाेता. धरून हलवलंही हाेतं. पण तुम्ही कसले झटका देऊन सुटलात ते. मला पाहिलं सुद्धा नाही. आठवतंय तरी का?’ ताे माणूस म्हणेल.
‘मला काहीही माहिती नाही. काल माझ्या घराला आग लागली हाेती.’ घराला आग लागल्यावर सारी चेतना तिकडे केंद्रित हाेते.डाेळ्यांच्या झराेक्यापासून चेतना बाजूला सरकते. कानांच्या खिडक्यापासून बाजूला सरकते.मग भले डाेळ्यांना दिसत असले तरी त्या माणसाला दिसत नसते. कानाला ऐकू आले तरी त्या माणसाला ऐकू येत नसते. जर सावधानता. अ‍ॅटेंशन बाजूला झाले. इंद्रियांपासून लक्षच बाजूला झाले तर इंद्रिये बिलकुल बेकार हाेऊन जातात.