ईश्वर ही संज्ञा मान्य असणारे बहुतांशी लाेक ईश्वर हा मूर्तीत असल्याचे मानतात. दगडा-धाेंड्याच्या, तांब्या-पितळेच्या मूर्तीत ईश्वराला पाहणारे अनेक लाेक चालत्या बाेलत्या जीवमात्राकडे मात्र दुर्लक्ष करतात. ईश्वर हा जीवमात्रात भरून उरला आहे किंवा सर्व जीव हे एका ईश्वराचे अंश आहेत, असा संदेश देणाऱ्या संतांच्या वचनाकडेही अनेकांचे दुर्लक्ष हाेते. असे दुर्लक्ष करणारे लाेक स्वत:मध्ये व इतर जीवामध्ये भगवंताला न पाहता केवळ त्याला मूर्तीतच पाहतात.
ज्याच्याकडे कसलाही दुर्गूण नाही त्याला देव संबाेधणारा हा सांसारिक माणूस आपल्यातील दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न करीत नाही. आपल्यातील दुर्गुण निघून गेला, तर आपणही ईश्वर स्वरूप आहाेत, याची जाण आपणाला हाेऊ शकते, हे प्रपंचात अडकलेल्या जीवाच्या लक्षात येत नाही आणि लक्षात आलेच तर मनातील विचारांच्या वादळामुळे व चिंता, माेह, माया, अहंकार, मत्सर, द्वेष, ताण-तणाव आदीमुळे त्याच्याकडून दुर्गुण घालवण्याचे कार्य हाेत नाही.
या जीवाकडून दुर्गुण घालवण्याचे कार्य घडले, तर हा जीव, हा देह ईश्वराचे चालते-बाेलते भांडारच आहे. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ।। जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448