नाम घेतल्याने प्रारब्ध भाेगातही आनंद असताे

    19-Dec-2022
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लाेक विचारतात.हा प्रश्न एका दृष्टीने ार महत्त्वाचा आहे. बहुतेक लाेक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुख-दु:ख आहे, किंबहुना, देह सुखी तर मी सुखी, आणि देह दु:खी तर मी दु:खी, अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे, प्रारब्धाचे भाेग हे आजपर्यंत काेणालाही चुकले नाहीत.मग कसे करावे? इथे असे लक्षात ठेवावे की, प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते; म्हणून, ज्याची देहबुद्धी कमी झाली ताे देहाच्या सुख-दु:खाने सुखी वा दु:खी हाेत नाही. नामाने देहबुद्धी कमी हाेते. म्हणून नामांत राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भाेग भाेगीत असताना देखील आनंदात असताे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य ार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते.
 
नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे.आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य नामाने लाभते, आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा हाेते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थांमध्ये काेणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जाेडायला नामासारखे साधन नाही.खराेखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू! अखंड नामात राहणे यालाच माेक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. जाे नामात अखंड गुंतला त्यालाच संत म्हणतात. नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझे एवढे ऐका, नामाला कदापिही विसरू नका.
 
प्रारब्धाच्या भाेगांना न कंटाळता, भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना, पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुद्धी कमी हाेणे हेच पुण्य हाेय, आणि ते नामाने प्राप्त हाेते. नामाने कलीची सत्ता नाहीशी हाेते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण हाेय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने हाेते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ हाेते आणि ताे पुण्यवान बनताे.देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून, जे हाेईल त्यात आनंद मानावा. भाेग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात, असे म्हटले की समाधान मिळेल.