माणसाचा जन्म तान्ह्या बाळाच्या स्वरूपात हाेताे आणि जसजसे ते माेठे हाेत जाते तसतसे ज्ञानप्राप्ती, विचारप्राप्ती आणि त्यातून कर्तृत्व असे त्याचे जीवन विस्तारत जाते. नदीचा उगम जसा एखाद्या डाेंगरात पडणाऱ्या छाेट्याशा धारेत असताे आणि पुढे तिला अनेक जलप्रवाह येऊन मिळत जातात आणि ती विशाल हाेत जाते, त्याचप्रमाणे मानवी जीवन आहे.म्हणूनच अनेकदा आपण बाेलतानाही आयुष्याला नदीची उपमा देताे आणि म्हणताे की, यांची जीवनसरिता संपन्न आहे. नदीला येऊन मिळणाऱ्या अनेक प्रवाहांप्रमाणेच माणसालाही आयुष्यात मातापिता, पत्नी, पुत्र, मित्र अशी अनेक नवनवीन नातीगाेती निर्माण हाेत जातात आणि त्याचा प्रपंचाचा पसारा विस्तारत जाताे.
श्राेत्यांच्या मनाची बैठक आतापर्यंतच्या ऐहिक गाेष्टींच्या निरूपणाने तयार केल्यानंतर आता श्रीसमर्थ आपला खरा उपदेशपर बाेध सांगावयास प्रारंभ करीत आहेत. वैराग्याचे निरूपण करणाऱ्या ‘‘वैराग्य निरूपण’’ या समासाने ते ही सुरुवात करतात. वैराग्य म्हणजे बाह्य आणि शारीरिक लाेभांपासून सुटका आणि षड्रिपुंपासून मु्नतता हाेय.श्री समर्थ म्हणतात की, आयुष्य ही एक नदी आहे.मात्र संपूर्ण आयुष्यात अनेक घटना, व्य्नती यांचा माेठा सहभाग असल्याने ती खरी महानदी म्हणावी लागेल आणि तिच्या प्रवाहात आणि प्रवासात मनामध्ये लाेभ, माेह, आशा, तृष्णा असे विविध रंगाचे तरंग सदैव उठत असल्याने, शिवाय कधीकधी त्यांचा जाेर विलक्षण असल्याने संसार हा महापूर आहे. या महापुरात व्य्नती, घटना आणि विकार यांची सतत दाटी झालेली आहे.