श्राेतीं काेप न करावा। हा मृत्युलाेक सकळांस ठावा ।।2।।

    14-Dec-2022
Total Views |
 
 

saint 
 
पुरुषाेत्तम असे पराक्रमी, विश्वविक्रमी कामगिरी करणारे आणि प्रचंड कार्याचा व्याप लीलया सांभाळणारे ज्यांना श्रीसमर्थ काैतुकाने ‘‘बहुत आटाेपाचे’’ म्हणतात असे महान कार्यकर्ते यांनाही आयुष्याची घटिका भरली की जावे लागतेच. शस्त्रविद्याप्रवीण, पराेपकारी संत, धर्मवंत सुपात्र, वादविद्यानिपुण, वेदविद्यातीर्थ, मतमतांचा परामर्श घेणारे समीक्षक, हे सर्व अंती मरणच पावतात. गायन, वादन, नर्तन अशा त्रिविध संगीतात पारंगत कलाचार्य आणि त्यांचे रसिकाग्रणी श्राेते हे दाेघेही मृत्यूच्या लेखी समानच आहेत.पराक्रमी आणि भेकड, सत्कीर्तिवान आणि दुष्कीर्तिवान, नीतिमंत राजा आणि अनीतिवान प्रजाजन साऱ्यांना मृत्यू या एकाच मार्गाने जावे लागते.मृत्यूची निश्चितता आणि अटळता पराेपरीने सांगण्यामागे श्रीसमर्थांचे दाेन हेतू आहेत. पहिला हेतू स्पष्टच आहे की, प्रत्येक मनुष्याने मृत्यू लक्षात घेऊन स्वहितासाठी नेटका प्रपंच करून त्याचबराेबर परमार्थही करावा. दुसरा हेतू थाेडा समजून घ्यावा लागेल.
 
अनेकदा आपल्या जवळची काेणी प्रिय व्यक्ती गेली की आपण दुश्चित हाेताे. बालकाच्या मृत्यूने आईची किंवा पतीच्या मृत्यूने पत्नीची अशी व्याकुळ अवस्था हाेते.श्रीसमर्थ त्यांनाही समजावू इच्छितात की, प्रिय व्यक्तीचा मृत्यू दु:खदायक आहेच, पण ताे अटळही आहे, हे लक्षात घेऊन आपण आपला शाेक आणि दु:ख याला आवर घालून नियंत्रित केले पाहिजे. मृत्यूचे चिरंतन सत्य समजून घेऊन विलाप व दुश्चित्तता थांबविली पाहिजे आणि जाणारा जीव सुखाने गेला म्हणून पुन्हा आपल्या कर्तव्याला लागले पाहिजे. वियाेगाचे दु:ख अपार असले तरी ते अनिवार्य आहे, हे जाणून घेण्यातच खरे ज्ञान आहे आणि त्यातूनच आयुष्याची क्षणभंगुरता समजून घेऊन सन्मार्गाकडे वळण्यातच आपले खरे आणि शाश्वत हित आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299