जें संताेषियां वाढिलें ताट। जें अचिंता अनाथाचें मायपाेट। भक्ती उजू वाट। जया गांवा।। 8.195

    14-Dec-2022
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
देहामध्ये सुप्त असलेल्या अक्षरपुरुषाचे वर्णन यात आले आहे. याला पुरुष असे म्हणण्याचे आणखी एक कारण की, हा प्रकृतीशी एकपत्नीव्रताने राहताे.या पतिव्रतेला साेडून ताे क्षणभरही राहत नाही. म्हणून ताे उत्तम पुरुषच मानला जाताे. या पुरुषाचे गगन हे पांघरूण असते. ताे आकाशापेक्षाही सूक्ष्म व व्यापक असताे. श्रेष्ठ याेगी पुरुष अशा या अक्षरपुरुषाला परात्पर म्हणतात.ताे आपल्या अनन्य भक्ताचा शाेध घेत असताे. जाे काेणी कायावाचा मनेकरून त्याच्या अक्षरपुरुषाखेरीज दुसरी गाेष्टच मानीत नाही, अशा एकनिष्ठ पुरुषाचे उत्तम पीक देणारे शेत म्हणजे हा अक्षरपुरुष हाेय.
 
अर्जुन, हे संपूर्ण त्रैलाेक्य सच्चिदानंदरूप आहे, असा ज्याचा मनाेधर्म बनला आहे त्या आस्तिक पुरुषाचा हा अक्षरपुरुष म्हणजे राहण्याचा आश्रमच आहे. निरभिमानी माणसाचे हे थाेरपण आहे. निर्गुणस्वरूप झालेल्या पुरुषाची जाणीव हाच आहे. हा अक्षरपुरुष म्हणजे विषयाबद्दल निरिच्छ झालेल्या पुरुषाचे परमसुखच असे राज्यच आहे.हा म्हणजे अखंड संतुष्ट पुरुषापुढे वाढलेले ताट आहे. संसाराची काळजी साेडून निश्चिंत झालेल्या पुरुषांना व परमेश्वरावाचून ज्यांना दुसरा स्वामीच नाही अशांना हा अक्षरपुरुष आईप्रमाणे पाेटाशी धरणारा आहे. या अक्षरपुरुषाच्या गावाला जाण्यासाठी भक्ती हाच एक सरळ मार्ग आहे. अर्जुना, आणखी किती विस्तार करून सांगू? ज्या ठिकाणी जायचे ते गावच आपण हाेऊन रहायचे. थंडगार वाऱ्याच्या झुळुकांनी जसे ऊन पाणी गार हाेते, सूर्यापुढे जसा अंधार टिकत नाही, त्याप्रमाणे संपूर्ण संसारच माेक्ष हाेऊन जाताे.