श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या प्रेमातील अनेक बारकावे ज्ञानेश्वरांनी माेठ्या मार्मिकतेने दाखविले आहेत.अर्जुनाचीच स्तुती करताना श्रीकृष्णांना आनंद हाेताे. आणि हा अर्जुन कसा? तर वारंवार शंका घेणारा, श्रीकृष्णांनाच ज्ञान शिकवू पाहणारा. पण एक गाेष्ट खरी की, साऱ्या त्रिभुवनाचे पुण्य अर्जुनाच्या ठिकाणी एकवटलेले असल्यामुळे भगवान त्याला वश झाले.स्वत: श्रीकृष्ण निर्विकार, निर्गुण असूनही त्यांना अर्जुनाच्या प्रेमाचा पाझर ुटला आणि या प्रेमाचे ज्ञानेश्वरांनी असे वर्णन केले की, श्राेतेही मनातून संतुष्ट झाले व म्हणू लागले की आमचे हे केवढे सुदैव आहे ! ज्ञानेश्वरांच्या शब्दांत केवढी विलक्षण शाेभा साठली आहे ! त्यांच्या भाषेची गाेडी जणू सप्तसुरांतील गायनापेक्षाही अधिक आहे. अहाे, काय नवलाची गाेष्ट आहे! ही गाेड वाणी काही सामान्य प्राकृत माणसाची नाही.
ही साधी मराठी भाषा वाटते; पण तत्त्वप्रतिपादनाच्या वेळी नाना प्रकारच्या अलंकारांनी व रसांनी ती साकार हाेत आहे. या मराठी भाषेतही ज्ञानाचे कसे सुंदर चांदणे पिठासारखे सर्वत्र पडले आहे. शुद्ध भावार्थाची शीतलाई सर्वत्र दाटून आली आहे. जणू हिच्याच प्रकाशामुळे गीतेतील श्लाेकांच्या अर्थांची कमळे विकसित पावत आहेत.श्राेत्यांच्या मनाची ही अवस्था पाहून निवृत्तीनाथ म्हणाले, लाेकहाे, सावध व्हा. श्रीकृष्णांच्या प्रसादरूपी प्रकाशाने पांडवांच्या कुळात नवलाईची प्रभात जणू उगवली आहे. यात शंका नाही. नाहीतर पहा की, हा कृष्ण देवकीच्या उदरात वाढला. अनेक खस्ता खाऊन यशाेदेने त्याचे पालन-पाेषण केले, पण त्यांना श्रीकृष्णाचा लाभ न हाेता शेवटी ताे पांडवांनाच उपयाेगी पडला.