भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती, आणि ‘हा सर्व विस्तार माझा नाही’ या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाव वैराग्य.‘प्रयत्नांती परमेश्वर’ या म्हणीचा अर्थ असा आहे की, प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणे न देणे हे देवाच्या इच्छेवर साेपवून आपण मनाने शांत राहावे.फलाची आशा न करता सत्कार्य करणे हे भक्तीचे लक्षण आहे, आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गाेष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचे लक्षण आहे.देहसुखाची अनासक्ती किंवा हवे-नकाे-पण टाकणे म्हणजेच वैराग्य. आसक्ती न ठेवता कर्तव्य करणे ही तपश्चर्याच आहे. इतकी तपश्चर्या केली पण तिच्यामुळे अभिमानाची वृद्धी झाली, मग हाती काय आले? काहीच न करणे सर्वांत कठीण आहे; हे एक भक्तालाच साधते.
जगातले सर्व लाेक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत शास्त्रांचे पुष्कळ संशाेधन हाेऊन इतकी सुधारणा झाली, त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले, पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताण जाेपर्यंत निघत नाही ताेपर्यंत त्याचा राेग बरा झाला नाही; त्याचप्रमाणे, मानव सुखी झाला नाही ताेपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये, मग धाेका नाही. जिथे आपणच दिवस गाेड करून घ्यायचा आहे तिथे राेजच दसरा का न करावा? मनापासून एखादी गाेष्ट हवी असे वाटणे म्हणजे त्या वस्तूचा संग हाेय. मागणे मागावे ही बुद्धीच न राहावी.
मी भगवंताचाच झालाे असे म्हणावे, आणि त्याच्याजवळ काही मागावे, हा विलगपणाच झाला! भगवंताजवळ काही मागावे लागले तर मग ‘भगवंत सर्व काही जाणताे’ या म्हणण्यात काय अर्थ? मला आज मिळाले ते त्याच्या इच्छेने मिळाले नसेल असे आपल्याला वाटते. ‘मला हवे असे वाटते’ ते प्रथम दूर करावे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तू मागितली तर काय उपयाेग? देणे-घेणे यात पूर्तता कधीच आली नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी आपण ठेवावी.त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय हाेण्याकरिता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये. देह असावा आणि त्याचे दुखणे नकाे असे म्हणून कसे चालेल? खरे म्हणजे जाणिवेत किंवा आसक्तीत सुखदु:ख आहे. गाढ निद्रा लागली आणि दुसऱ्याला काही झाले, तर मला कुठे त्याचे काही वाटते! नामापरते दुसरे काही नाही हे समजावे. जगात भगवंतावांचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा ताेच खरा याेगी, ज्ञानी आणि परमार्थी समजावा.