आत्मज्ञान प्राप्त झालेल्या माणसाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी याही ठिकाणी केले आहे.त्याने आपल्या मनास जिंकलेले असते. त्याच्या सर्व इच्छा तृप्त झालेल्या असतात.या पुरुषाला परमात्मा स्वत:पासून दूर आहे, वेगळा आहे असे वाटत नाही. साेन्यातील हीण नाहीसे झाले की साेने शुद्ध राहते, तसे संकल्प नाहीसा झाला की जीवच परमात्मा हाेताे. घटाचा आकार नाहीसा झाला की त्यातील आकाश आकाशरूपी हाेते, त्याप्रमाणे देहाभिमान संपला की परमात्मरूप हाेण्यासाठी काही करावे लागत नाही.सुखदु:खे, मानापमान यांचा संभवच त्याच्या ठिकाणी नसताे. सूर्य जेथे जाईल तेथे ताे प्रकाश नेताे.त्याप्रमाणे आत्मज्ञानी मनुष्य जे पाहील त्याच्याशी एकरूप हाेताे. दुजेपणा हरपताे. शरीर धारण करूनच ताे परब्रह्माशी एकरूप हाेताे. ताेच खरा जितेंद्रिय.
ताेच याेगी. त्यालाच लहानथाेर असा भेद वाटत नाही. साेन्याचा डाेंगर अथवा मातीचे ढेकूळ ताे सारखेच मानताे. मित्र, शत्रू, आपला, परका असा भेदभाव त्याच्या ठिकाणी उरत नाही. मीच सर्व विश्व आहे अशी भावना त्याच्या ठिकाणी निर्माण हाेते.हे अधम, हे उत्तम अशी भावना त्याच्या मनात नसते. हे विश्वरूप अलंकार वेगवेगळे दिसत असले तरी ते ब्रह्मरूप साेन्याचेच आहेत हे ताे जाणताे. वस्त्र म्हणजे उभ्या आडव्या धाग्यांचे मीलनच नव्हे काय? याप्रमाणे सर्व विश्वात ब्रह्मतत्त्वापासून दुसरे काही नाही असे ताे समबुद्धीने जाणताे. ताे सर्व पवित्र वस्तूंचा राजा बनताे. त्याचे दर्शन झाले असता मनात पूज्यबुद्धी निर्माण हाेऊन माेहग्रस्तालाही आत्मबाेध हाेताे. स्वर्गसुखे त्याची खेळणी बनतात.