ओशाे - गीता-दर्शन

    03-Nov-2022
Total Views |
 
 

Osho 
 
आपण आपली जी निर्मिती करीत असताे, तेच आपण मिळवत असताे.आपण ज्याची तयारी करताे, तेच आपल्याला मिळते.आपण ज्या दिशेला चाललाे आहाेत, तेथेच आपण पाेहाेचत असताे. आपण ज्या दिशेला जातच नाही, तिकडे आपण पाेहाेचतच नाही. पण असे हाेऊ शकते की, प्रवास करताना आपल्या मनातल्या मनात, कल्पनेत आपण दुसरेच काेणतेतरी लक्ष्य मनात ठेवलेले असावे. पण त्याचा काहीही संबंध रस्त्याशी नाही. मी नदीकडे चाललाे आहे आणि मनात म्हणताेय की, आपल्याला नदीकडे जायचे आहे. पण जर मी विरुद्ध दिशेला बाजाराला जाणाऱ्या रस्त्याने गेलाे, अन् मग मी कितीही मनात आणले की आपण नदीकडे चाललाे आहे तरी मी पाेहाेचणार बाजारातच.
 
माणूस जिथे काेठे पाेहाेचताे ताे विचार करण्याने नव्हे तर ज्या रस्त्याने चालताे त्या रस्त्याद्वारे तिथे पाेहाेचताे.लक्ष्य मनात ठरत नाही तर पावले काेणत्या रस्त्याने पडताहेत याने ठरत असते.आपण स्वप्ने काेणतीही पाहत रहा. आपण लिंबाेणी पेरली आहेत आणि त्याला कुठली स्वादिष्ट, मधुर फळे लागणार आहेत. असे स्वप्न कदाचित आपण पाहत असाल, पण आपल्या स्वप्नातून फळे निघत नसतात. आपण जी बीजे पेरली त्यातून ती येणार आहेत. म्हणून जेव्हा शेवटी कडूनिंब हाती येताे, तेव्हा आपल्याला दु:ख हाेते, पश्चात्ताप हाेताे.