माणसाच्या शरीराला हाेणाऱ्या अंगभूत त्रासांची आणि व्याधींची म्हणजेच आध्यात्मिक तापाची लक्षणे सहाव्या समासात विषद केल्यानंतर आता सातव्या समासात श्रीसमर्थ आधिभाैतिक तापाचे निरूपण करीत आहेत.जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा जगात असणाऱ्या अन्य वस्तूंशी आयुष्यभर संबंध येत असताे. या संबंधांतून जाे त्रास हाेऊ शकताे. त्यालाच तापत्रयीपैकी आधिभाैतिक ताप म्हटले जाते.या अन्य वस्तू अचेतन म्हणजे नदी, नाले, घरेदारे, डाेंगरदऱ्या अशा किंवा माणसे, प्राणी, पशू-पक्षी अशा सचेतन असू शकतात. या दाेन्ही वर्गाकडून हाेणारा त्रास आधिभाैतिकच मानला जाताे.
श्रीसमर्थांचे निरीक्षण कसे बारकाव्याचे आणि दैनंदिन जीवनाच्या व्यवहारांच्या मुळापाशी जाणारे आहे, हे दासबाेधात ठायी ठायी प्रत्ययाला येते, हा समासही त्याला अपवाद नाही.आजच्या काळातील मेडिकल इन्शुरन्स स्पष्ट करणारा मागील समास हाेता तर या समासातील आधिभाैतिक ताप हे जनरल इन्शुरन्सची सहजपणे आठवण करून देणारे आहेत.आपण सहजी कल्पनाही करू शकणार नाही अशी अनेक उदाहरणे आणि श्नयता श्रीसमर्थांनी स्पष्ट केल्या आहेत. अशा प्राणिमात्रांच्या आणि अचल वस्तूंच्या सान्निध्यामुळे माणसाला सुख आणि दु:ख दाेन्हीही प्राप्त हाेते. एखादा सज्जन मित्र भेटला तर सुख हाेते तर एखादा दुष्टबुद्धी भेटला तर ताे त्रास देऊन दु:खच देत असताे.