येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावे मज भजले । तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ।। 7.97

    29-Nov-2022
Total Views |
 
 

dyaneshwari 
दुस्तर अशी मायानदी काेण तरून जाते? याचे उत्तर ज्ञानेश्वर या ओवीत देत आहेत. ही मायानदी अगदी सहजासहजी तरून जाता येते.जाे जीव सर्वभावे परमेश्वराचे भजन करताे, ताेच ही नदी सुखरूपपणे तरून जाताे. ही मायानदी किती दुस्तर असते याचेही वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. एक नवलाची गाेष्ट अशी की, ही मायानदी तरून जाण्याचा जाे जाे उपाय करावा ताे ताे अपायच हाेताे.आपल्या बुद्धीच्या जाेरावर ही नदी तरून जाण्याचा जाे मनुष्य प्रयत्न करील ताे शहाणपणाच्या डाेहात बुडेल. तीन वेदांची सांगड बांधून, बराेबर अहंकाराचे धाेंडे घेऊन या नदीत उतरले ते मदरूपी माशाच्या ताेंडी सर्वच्या सर्व गेले. ही मायानदी तरून जाण्यासाठी लाेक काय काय उपाय करतात? याचेही दर्शन ज्ञानेश्वर घडवितात. कमरेला तारुण्याची कास बांधतात पण त शेवटी मदनाच्या ताब्यात जातात. विषयरूपी मगरी त्यांना चघळून टाकतात.
 
म्हातारपणी ही नदी तरून जावे असे म्हटले तर मनुष्य बुद्धिभ्रंशाच्या जाळ्यात अडकताे. ताे शाेकाच्या किनाऱ्यावरच आदळताे. क्राेधाच्या भाेवऱ्यात सापडून कासावीस हाेताे. थाेडे डाेके वर काढावे तर त्याला गिधाडे टाेचतात. चिखलाने भरलेला हा मनुष्य शेवटी मरणरूपी गाळातच फसताे. काही लाेक यजनक्रियेची पेटी बांधून या नदीत उतरतात आणि स्वर्गसुखात रमतात.विधिनिषेधाच्या प्रवाहात सापडतात.ही नदी तरून जाण्यासाठी वैराग्याची नाव मिळत नाही. विवेक टिकत नाही. मग जीवाने स्वत:च्या सामर्थ्याने ही माया कशी तरून जावे? पथ्य न करता कधी राेग आटाेक्यात येईल का? हरणाचे पाेर जाळे ताेडील काय? मुंगी मेरूपर्वत गिळील काय? हे जर शक्य झाले तरच मायानदी तरून जाता येईल. कामी पुरुषाला स्त्री जिंकणे शक्य नसते, तसेच या मायानदीचे आहे. ही भक्तिमार्गानेच तरून जाता येते.