पत्र एकाेणतीसावे
एकदा नारदाची स्वारी त्याच्याकडे आली व म्हणाली.‘हे म्हतारे लाेक गादीला चिकटून राहतात. तरुणांना वाव देत नाहीत. अशा परिस्थितीत तू आपल्या बापाला कैदेत टाकून राज्य बळकावलेस हे बरे केलेस’ नारदाने केलेली ही स्तुती ऐकून कंसाला बरे वाटले वत्याने विचारले.‘हे ठीक आहे, पण देवलाेकात माझ्या विरुद्ध काही कट तर शिजला नाही ना?’ नारद म्हणाले- ‘अरे, तेच सांगण्याकरता मुद्दाम मी तुझ्याकडे आलाे.वसुदेव देवकीचा आठवा पुत्र म्हणून प्रत्यक्ष विष्णू अवतार घेईल व ताे तुला ठार मारील.’ लगेच कंस म्हणाला- ‘देवकीचे सर्वच पुत्र मी ठार मारताे, म्हणजे आठवा काेठून माेजणेचा ह्याबद्दल संशय नकाे. आठवा म्हणजे देव मला फसवू पहातील, पण देवकीचे सर्वच पुत्र मारून मीच देवास फसवताे.’ असे म्हणून हा हा हा असा कंसाने अट्टाहास केला.उग्रसेनाचा धाकटा भाऊ देवक ह्याची मुलगी देवकी वसुदेवास दिली हाेती.
वसुदेव हा जहागिरदार हाेता व त्याची जहागिरी गाेवर्धन पर्वताच्या जवळ हाेती. ज्याप्रमाणे काेल्हापूर हे संस्थान असताना तेथल्या जहागिरदारांचे वाडे काेल्हापूरास असत त्याप्रमाणे वसुदेव हा आपल्या जहागिरीच्या गावी रहात असला तरी त्याचा वाडा मथुरेला हाेता. कंसाने वसुदेवदेवकीना ह्या वाड्याच्या बाहेर जाण्यास बंदी केली. त्यांना तुरुंगात टाकले असे म्हणण्यापेक्षा त्यांना कंसाने स्थानबद्ध केले.देवकीला मूल झाले असे कळले म्हणजे सैतानाला लाजवणारा कंस वसुदेवाच्या वाड्यात येई व रडणाऱ्या देवकीच्या हातून ते मूल हिसकावून घेऊन त्याच्या तंगड्या दाेन्ही हातानी धरून उंचावरून ते मूल शिळेवर जाेरात आपटी व त्याचा प्राण घेई. अशा तऱ्हेने कंसाने देवकीचे सहा पुत्र दुष्टपणाची कमाल करून ठार मारले.देवकी सातव्या वेळी गर्भार राहिली पण त्यावेळी गर्भपात झाला.
वसुदेवाची ज्येष्ठ पत्नी राेहिणी ह्या वेळी गर्भार राहिली तिच्या मुलालाही कंस मारील ह्या भीतीने वसुदेवाने त्याच्या जहागिरीच्या शेजारच्या गवळी वाड्याच्या पाटील नंद त्याचा जिवलग मित्र हाेता त्याच्या घरी तिला पाेचवले.कृष्णाच्या वेळी देवकी गर्भार झाली. पूर्वी देवकी फार दु:खी असे, पण तिच्या पाेटात कृष्ण आल्यावर ती फार आनंदी दिसू लागली. ती म्हणू लागली.आता मला दु:खात देखील सुख दिसू लागले आहे.रामायणात असा प्रसंग आहे कीकाैसल्या गर्भार असताना राम तिच्या स्वप्नात आला व म्हणाला.‘आई, तुला फार त्रास हाेत आहे, ह्यापेक्षा मी एकदम आठ वर्षांचा हाेऊन तुझ्या पुढे येताे.रामा, तू देव असलास तरी पुरुष आहेस. मातेला काय वाटते, आईला काय वाटते ते मी तुला सांगते ऐक.
राम तू माझ्या पाेटात नऊ महिने नऊ दिवस रहावेस.मला कितीही दु:ख झाले तरी मला वाटेल की या दु:खात देखील सुख आहे.
रामा तू एकदम माेठा हाेऊ नकाेस. आधी रांगू लाग खूप खाेड्या कर, लाेक म्हणतील मला तू त्रास देत आहेस, पण रामा, मला वाटेल की ह्या त्रासात ह्या दु:खात देखील सुख आहे.रामा, तू एकदम व्याकरणशुद्ध बाेलू नकाेस, अरे, बाेबड्या बाेलात आनंद आहे ताे व्याकरणशुद्ध भाषेत नाही.रामा, तू हळू हळू माेठा हाे, दु:खात जे सुख असते ना त्याचा मला अनुभव घेऊ दे.असा तू माेठा झालास तर मला वाटेल की- तू माझा सख्खा मुलगा आहेस आणि जर का तू एकदम आठ वर्षांचा हाेऊन माझ्या पुढे आलास तर मला वाटेल की तू माझा दत्तक मुलगा आहेस.’